Nanded News – अवैध धंद्यांवर पोलिसांची जिल्हाभर मास रेड! एकाच दिवशी 82 गुन्हे दाखल; 20.13 लाखांचा मुद्देमाल जप्त
नांदेड जिल्हा पोलिसांनी अवैध धंद्यांविरोधात एकाच दिवशी संपूर्ण जिल्ह्यात धडक मोहीम राबवत जोरदार छापेमारी केली. पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशाने २१ नोव्हेंबर रोजी उशीरा शहरी आणि ग्रामीण भागातील सर्व पोलीस ठाण्यांनी समन्वयाने ही कारवाई केली. या मोहिमेत मटका-जुगार, अवैध दारू विक्री आणि गोवंश तस्करीसह विविध बेकायदेशीर अड्ड्यांवर धाडी टाकून तब्बल ८२ गुन्हे दाखल करण्यात आले व ११८ आरोपींवर कारवाई करत एकूण २० लाख १३ हजार ८१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या कारवाईमध्ये मटका-जुगार प्रकरणी १३ गुन्हे दाखल करून ४८ आरोपींवर कारवाई आणि १६ लाख ९५ हजार ६४० रुपयांचा मुद्देमाल, तर दारूबंदीच्या ६८ गुन्ह्यांत ६९ आरोपींवर कारवाई करून २ लाख ६८ हजार १७० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. तसेच गोवंश प्रकरणात ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, अपर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी आणि सर्व ठाणे प्रभारींच्या मार्गदर्शनाखाली विविध पोलीस ठाण्यांच्या पथकांनी ही मोहीम यशस्वीरीत्या राबविली.
Comments are closed.