एमएमआरडीएच्या निकृष्ट कामाचा म्हाडाला भुर्दंड! पनवेलमध्ये गिरणी कामगारांच्या इमारतीमधील लिफ्ट बदलणार, नवीन लिफ्टसाठी साडेआठ कोटी रुपये खर्च करणार
एमएमआरडीएने उभारलेल्या कोन–पनवेल येथील गिरणी कामगारांच्या गृहप्रकल्पातील लिफ्ट वारंवार बंद पडत असल्याने अखेर म्हाडावर त्या बदलण्याची वेळ आली आहे. वारंवार दुरुस्ती करूनही लिफ्टचा प्रश्न सुटत नसल्याने अकरा इमारतींमधील 22 लिफ्ट पूर्णपणे बदलण्याचा निर्णय म्हाडाने घेतला आहे. या कामासाठी म्हाडा सुमारे साडेआठ कोटी रु. खर्च करणार आहे.
मुंबईत घरे उपलब्ध नसलेल्या गिरणी कामगारांसाठी महामुंबई क्षेत्रातील एमएमआरडीएच्या भाडेतत्त्वावरील गृहप्रकल्पातील काही घरे राखीव ठेवण्यात आली होती. त्यानुसार म्हाडाने 2016 मध्ये कोन, पनवेल येथील 2,417 घरांसाठी सोडत काढली होती. या गृहप्रकल्पात एकूण अकरा इमारती असून त्यापैकी दोन इमारती सात मजली, तर उर्वरित इमारती 18 ते 20 मजल्यांच्या आहेत.
मात्र या इमारतींमधील लिफ्ट वारंवार नादुरुस्त होत असल्याने विशेषतः वयोवृद्ध गिरणी कामगार, महिला आणि लहान मुलांना इमारतीत ये-जा करताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. विद्युत निरीक्षकांनी पाहणी करत दुरुस्ती करण्याऐवजी जुन्या लिफ्ट बदलण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार म्हाडाने निविदा प्रक्रिया राबवून नवीन लिफ्ट बसविण्यासाठी कंत्राटदाराची निवड केली आहे.
- नवीन लिफ्ट बसविण्याचा संपूर्ण खर्च सध्या म्हाडा स्वतःच्या तिजोरीतून करणार आहे, मात्र हा खर्च एमएमआरडीएला देण्यात येणाऱ्या पैशांमधून वळता केला जाणार असल्याची माहिती म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱयाने दिली. निकृष्ट दर्जाच्या कामामुळे यापूर्वी या गृहप्रकल्पातील घरांच्या दुरुस्तीवर 52 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.
Comments are closed.