मुंबईत पारा आणखी घसरणार, आठवडाभर थंडीचा जोर!

राज्याच्या ग्रामीण भागाप्रमाणे मुंबई शहर आणि परिसरात थंडीचा जोर वाढला आहे. रविवारी सलग दुसऱ्या दिवशी मुंबईचा पारा 20 अंशांच्या खालच्या पातळीवर राहिला. सांताक्रुझमध्ये सरासरीपेक्षा 3.4 अंशांनी कमी म्हणजेच 17.2 अंश किमान तापमानाची नोंद झाली. शहरात पुढील आठवडाभर पारा घसरताच राहणार आहे. किमान तापमान 18 ते 19 अंशांच्या आसपास राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

मुंबई शहर व उपनगरांत शनिवारी किमान तापमान 16.2 अंशांपर्यंत खाली आले. हे तापमान यंदाच्या हंगामातील आतापर्यंतचे नीचांकी तापमान ठरले. त्यापाठोपाठ रविवारी सलग दुसऱ्या दिवशी तापमानात मोठी घसरण झाली. सांताक्रुझमध्ये कमाल आणि किमान अशा दोन्ही पातळय़ांवर तापमानात घट झाली. कमाल तापमान 32 अंश, तर किमान तापमान 17.2 अंश इतके नोंद झाले. कुलाब्यात 22.1 अंश किमान तापमान नोंदवण्यात आले. शहर परिसराच्या तुलनेत उपनगरांत थंडीची तीव्रता अधिक जाणवली. ठाणे जिह्यातही थंडीचा कडाका वाढला असून रविवारी 17.8 अंश इतके तापमान होते. डहाणूमध्ये 16.5 अंश, माथेरानमध्ये 16.2 अंश, महाबळेश्वरमध्ये 14.9 अंश तापमानाची नोंद करण्यात आली. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, आठवडाभरात मुंबई-ठाण्यासह संपूर्ण राज्यभरात थंडीचा मुक्काम कायम राहणार आहे. –

जळगाव जिह्यात थंडीचा जोर दिवसेंदिवस वाढत असून तापमानाचा पारा थेट 8 अंश सेल्सिअसवर घसरला आहे. विशेष म्हणजे अवघ्या एका रात्रीत तापमानात तब्बल 4 अंशांची घसरण झाल्याने यंदाच्या हंगामातील आतापर्यंतच्या नीचांकी तापमानाची नोंद झाली आहे.

प्रदूषणाचे हॉटस्पॉट

आंबिवली- अंधेरी ः      189

आराम नगर: 190

बोरिवली पश्चिम ः      184

चेंबूर पश्चिम     ः         186

धाकोजी सेठपाडा : १९४७

जीत नगर: 191

जुहू                  ः         189

हवेची गुणवत्ता पुन्हा ढासळली!

शहरातील वाढत्या प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. हवेची गुणवत्ता पुन्हा ढासळली असून रविवारी हवेचा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) ‘आरोग्याला घातक’ श्रेणीत पोहोचला. शहराच्या अनेक भागांत 180 ते 194 अंकांपर्यंत एक्यूआयची नोंद झाली. फटाक्यांबरोबरच हवेतील धूलिकणांमुळे प्रदूषण वाढले आहे. याचा मुंबईकरांच्या आरोग्यावर परिणाम झाला असून अनेक नागरिक सर्दी-खोकला व श्वसनाच्या आजारांनी त्रासले आहेत.

Comments are closed.