सणासुदीला फुकटय़ा प्रवाशांची वर्दळ; मध्य रेल्वेने 15 दिवसांत वसूल केला 25 कोटींचा दंड

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

दिवाळी आणि छठपूजा या सणांनिमित्त रेल्वेमध्ये झालेल्या गर्दीचा गैरफायदा फुकटय़ा प्रवाशांनी घेतला. मध्य रेल्वे मार्गावरील प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेत सोडण्यात आलेल्या दिवाळी/छठ विशेष गाडय़ांमध्ये विनातिकीट प्रवाशांनी घुसखोरी केली. त्या प्रवाशांविरोधात कारवाईची धडक मोहीम हाती घेत मध्य रेल्वेने 15 दिवसांत 25 कोटींचा दंड वसूल केला. एकूण 2.27 लाख विनातिकीट प्रवाशांवर कारवाई करण्यात आली.

मध्य रेल्वेच्या तिकीट तपासणी पथकांनी आपल्या संपूर्ण नेटवर्कवर विनातिकीट व अनधिकृत प्रवाशांविरुद्ध विशेष मोहीम राबवली. 1 ते 15 नोव्हेंबरपर्यंत नियमित तपासणीव्यतिरिक्त विविध स्थानकांवर आणि गाडय़ांमध्ये विशेष तपासणी मोहिमा राबवण्यात आल्या. या काळात 2.27 लाख प्रवाशांकडून 24.74 कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. मुंबई विभाग आणि मुख्यालय तिकीट तपासणी पथकांनी 1.06 लाख प्रकरणांतून 11.04 कोटी रुपयांचा दंड वसूल केला. त्यापाठोपाठ भुसावळ विभागाने 64,332 प्रकरणांतून 7.98 कोटी रुपयांचा दंड वसूल केला. तसेच पुणे विभागाने 23,189 प्रकरणांत 2.67 कोटी रुपये, नागपूर विभागाने 24,253 प्रकरणांत 2.25 कोटी रुपये, सोलापूर विभागाने 9,134 प्रकरणांत 79.38 लाख रुपये दंड वसूल केला. मध्य रेल्वेने या वर्षी दिवाळी/छठपूजेनिमित्त 250 पेक्षा अधिक विशेष रेल्वे चालवण्यात आल्या. त्या गाडय़ांमधून 56 लाखांहून अधिक प्रवाशांनी प्रवास केला.

Comments are closed.