सभागृहात मंत्र्यांची उपस्थिती सक्तीची, संसदीय कार्य विभागाचे आदेश जारी
विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असताना चर्चेच्या दरम्यान अनेकदा मंत्रीच सभागृहात उपस्थित नसतात. सचिव तर गायबच असतात. यावरून मागील अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधी सदस्यांनी पीठासीन अधिकाऱ्यांनाच धारेवर धरले होते. सभागृहाचे कामकाजच तहकूब करण्याची वेळ आली होती. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून सभागृहात मंत्र्यांची उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे. सचिव आणि अधिकाऱ्यांनी सभागृहाचे कामकाज संपेपर्यंत गॅलरीतच बसण्याचे निर्देश संसदीय कार्य विभागाने जारी केले आहेत.
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात विरोधकांच्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी संबंधित विभागाचे मंत्री सभागृहात उपस्थित नव्हते. त्यावरून मोठा गदारोळ झाला होता. विरोधकांनी सभागृहात आक्रमक पवित्रा घेतला होता. संबंधित खात्याचे सचिवही चर्चेच्या वेळेस अनेकदा उपस्थित नव्हते. त्यावरून सभागृहाचे कामकाज काही काळासाठी तहकूब करण्याची वेळ आली होती. जुलैमधील पावसाळी अधिवेशनात संबंधित खात्याचे मंत्री सभागृहात उपस्थित नसल्याने विधान परिषदेचे कामकात 25 ते 30 मिनिटे तहकूब करावे लागले होते. त्यामुळे पीठासीन अधिकाऱ्यांवर मोठी नामुष्की येते.
विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन येत्या 7 डिसेंबरपासून नागपूरमध्ये सुरू होत आहे. विधिमंडळाच्या मागील अधिवेशनाची नागपूरमध्ये पुनरावृत्ती होऊ नये म्हणून संसदीय कार्य विभागाने हिवाळी अधिवेशनातील कामकाज प्राधान्याने हाताळण्याबाबत परिपत्रकच जारी केले आहे.
आक्षेप घेतल्यास संबंधित अधिकाऱ्यांना कळवावे
कामकाजाच्या वेळेस मंत्री तसेच सभागृहाच्या गॅलरीत विभागाचे संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहतील याची दक्षता घ्यावी. विभागाशी संबंधित कामकाज सुरू असताना मंत्री किंवा सचिव सभागृहाच्या गॅलरीत उपस्थित नसल्याने सदस्यांनी आक्षेप घेतल्यास सदरची बाब मंत्री व सचिव कार्यालयातील संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कळवण्याची आणि विभागाचे मंत्री सभागृहात व सचिव सभागृहाच्या गॅलरीत उपस्थित राहतील याची दक्षता घेण्याचे निर्देशही संसदीय कार्य विभागाने दिले आहेत.
परिपत्रकात काय म्हटले आहे
विधान मंडळाच्या दोन्ही सभागृहांतील सदस्यांकडून संसदीय आयुधांद्वारे उपस्थित करण्यात येणाऱ्या बाबींवर शासनाकडून कार्यवाही करण्यासाठी विधान मंडळ सचिवालयाकडून विधानसभा व विधान परिषद नियमांद्वारे निश्चित करण्यात आलेल्या कालमर्यादेचे सर्व मंत्रालयीन विभागांनी काटेकोर पालन करणे आवश्यक आहे.
आश्वासने तातडीने निकाली काढा
सभागृहात मंत्र्यांनी दिलेली आश्वासने तसेच अध्यक्षांच्या निर्देशांवर तातडीने कार्यवाही करावी. आश्वासने प्रलंबित राहणार नाहीत याची दक्षता घेण्याचे निर्देशही दिले आहेत.
गॅलरीत अधिकाऱ्यांची उपस्थिती आवश्यक
मागील अधिवेशनात काही विभागाचे सचिव सभागृहाच्या गॅलरीत उपस्थित नव्हते. त्याच्यावरून झालेला गदारोळ लक्षात घेऊन यंदा अधिकारी वर्गालाही संसदीय कार्य विभागाने तंबी दिली आहे. सभागृहाच्या कामकाजावर लक्ष ठेवण्यासाठी गॅलरीत अधिकारी उपस्थित असणे आवश्यक असल्याचे निर्देश जारी केले आहेत. कामकाज संपेपर्यंत गॅलरीत जबाबदार अधिकारी दररोज उपस्थित राहतील याची खबरदारी घेण्याचे आदेशही दिले आहेत.
दिशाभूल करणारी उत्तरे नकोत
उत्तरे निश्चित करताना विधान मंडळ सचिवालयाने त्यांच्या पत्रात दिलेल्या सूचनांनुसार विहित नमुन्यात आणि विहित मुदतीत सादर करणे आवश्यक आहे. अपूर्ण किंवा दिशाभूल करणारी उत्तरे दिल्यास सभागृहात सदस्यांकडून आक्षेप घेतला जाईल याची जाणीव सर्व संबंधित विभागांना करून देण्यात आली आहे.
Comments are closed.