कचरा उचलण्यासाठी पैसे द्यावे लागणार; हॉटेल, रेस्टॉरंट, कॅटरिंग, रुग्णालये, शाळांसाठी दरपत्रक
यंत्रमाग नगरी असलेल्या भिवंडी शहरात हॉटेल, रेस्टॉरंट, खानावळ यांचा कचरा मोठ्या प्रमाणावर जमा होतो. आतापर्यंत घंटागाडी हा कचरा घेऊन जायची. मात्र यापुढे कचरा उचलण्यासाठी पैसे द्यावे लागणार आहेत. कॅटरिंग, रुग्णालय, शाळा, दुकाने, मॉल, सुपरमार्केट यांचा कचरा गोळा करण्यासाठी 23 प्रभागांमध्ये स्वतंत्र ठेकेदार नेमण्याचा निर्णय भिवंडी महापालिकेने घेतला आहे. या सर्व आस्थापनांना दरमहा 600 ते 2400 रुपये द्यावे लागणार असून पालिकेने दरपत्रकही जाहीर केले आहे. याबाबतच्या प्रस्तावावर महासभेत शिक्कामोर्तब झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी करण्यात येईल.
बऱ्याच वेळा हॉटेल, खानावळ, मंगल कार्यालयातील कचरा रात्री उशिरा रस्त्याकडेला फेकला जातो. त्याची दुर्गंधी व अस्वच्छता पसरत असल्याने सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न उपस्थित होत असल्याच्या तक्रारी वाढल्याने पालिका प्रशासनाने उपलब्ध यंत्रणेव्यतिरिक्त व्यावसायिक आस्थापनांमध्ये जमा होणारा कचरा संकलनासाठी स्वतंत्र व्यवस्था कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला आहे.
23 प्रभागांमध्ये नेमणार स्वतंत्र ठेकेदार
शहरात दररोज सुमारे 450 ते 500 मेट्रिक टन घनकचरा निर्माण होत असून वाढती लोकसंख्या आणि बांधकाम प्रकल्पांमुळे कचऱ्याचे प्रमाण वाढत आहे. कचऱ्याचे वर्गीकरण आणि व्यवस्थापन करण्याच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 1 ते 23 मध्ये स्वतंत्र संस्थांची नियुक्ती करण्याचे प्रस्तावित आहे. या संस्थांमार्फत व्यावसायिक आस्थापनांचा ओला व सुका कचरा स्वतंत्रपणे संकलित करून त्याची वाहतूक केली जाणार आहे.
असे आहेत दर
प्रतिमाह 10 किलोपर्यंत 600 रुपये, 10 ते 20 किलोपर्यंत 1200 रुपये, 20 ते 50 किलोपर्यंत 1800 रुपये, 50 ते 100 किलोपर्यंत 2400 रुपये शुल्क आकारणी केली जाणार आहे, अशी माहिती उपायुक्त मुख्यालय विक्रम दराडे यांनी दिली आहे.
Comments are closed.