Latur News – दुष्काळाच्या झळांनी होरपळणाऱ्या बळीराजाची बोअर चालकांकडून लूट!
भीषण दुष्काळाच्या झळांनी होरपळणाऱ्या बळीराजाच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेत बोअरवेल (विंधनविहीर) मशीन मालकांनी लुटमारीचा धंदा मांडला आहे. केवळ प्रतिफूट दरात दररोज मनमानी वाढ करून शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूकच केली जात नाही, तर जुने बोअर ‘रिबोअर’ करण्यास स्पष्ट नकार देत शेतकऱ्यांची चौफेर कोंडी केली आहे. धक्कादायक म्हणजे, टंचाई कायद्याचे सर्रास उल्लंघन करत 200 फुटांपेक्षा अधिक खोल बोअर घेतले जात असतानाही स्थानिक प्रशासन आणि भूजल विभागाने मात्र डोळ्यांवर पट्टी बांधली असल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाचा भडका उडाला आहे.
दररोज मनमानी दरवाढ; बळीराजा कर्जबाजारी
परिसरात पाण्याची पातळी रसातळाला गेल्याने उभी पिके वाचवण्यासाठी आणि पिण्याच्या पाण्यासाठी शेतकरी हवालदिल झाला आहे. नवीन बोअर घेण्याशिवाय बळीराजासमोर पर्याय उरलेला नाही. या मजबुरीचा गैरफायदा घेत बोअर मशीन चालकांनी दररोज प्रतिफूट दरात अनियंत्रित वाढ सुरू केली आहे. प्रशासनाचा कोणताही अंकुश नसल्याने अव्वाच्या सव्वा दर आकारले जात असून, आधीच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना उसनवारी करून किंवा घरचे दागिने गहाण ठेवून बोअरसाठी पैसे उभे करावे लागत आहेत.
कमी नफ्यासाठी जुन्या बोअरकडे पाठ
नवीन बोअरचा खर्च परवडणारा नसल्याने अनेक शेतकरी आपल्या शेतातील जुने किंवा पाणी कमी झालेले बोअर ‘रिबोअर’ (साफसफाई व खोलीकरण) करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, रिबोअरच्या कामात कमी नफा मिळत असल्याने मशीन चालक हे काम करण्यास स्पष्ट नकार देत आहेत. केवळ नवीन बोअरच्या ऑर्डर्स घेऊन जास्तीचा मलिदा लाटण्यावर त्यांचा भर असल्याने शेतकऱ्यांची मोठी अडचण झाली आहे.
टंचाई कायद्याला हरताळ
दुष्काळी परिस्थितीत भूगर्भातील पाणीपातळी टिकवून ठेवण्यासाठी टंचाई काळात 200 फुटांपेक्षा जास्त खोल विंधनविहीर घेण्यास कायद्याने सक्त बंदी आहे. परंतु, महाराष्ट्र भूजल अधिनियमाचे (टंचाई कायद्याचे) नियम धाब्यावर बसवून बोअर मशीन चालक सर्रास 200 फुटांपेक्षा जास्त खोलीचे बोअर घेत आहेत. यामुळे भूजलाचा अमर्याद उपसा होऊन भविष्यातील पाणीटंचाई अधिक गडद होत आहे, तर दुसरीकडे जास्तीच्या खोलीचे बिल भरताना शेतकऱ्यांच्या खिशाला मोठी कात्री लागत आहे.
शेतकऱ्यांची अशी उघड लूट सुरू असताना महसूल आणि भूजल विभाग मात्र बघ्याची भूमिका घेत आहे. प्रशासनाने तातडीने या प्रकरणात हस्तक्षेप करून बोअर खोदकामाचे दर निश्चित करावेत, जुने बोअर रिबोअर करणे बंधनकारक करावे आणि 200 फुटांखाली खोलीकरण करून कायदा मोडणाऱ्या मशीन चालकांवर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी संतप्त शेतकरी वर्गातून होत आहे.
Comments are closed.