Latur News – रेल्वे कोच फॅक्टरीत गैरव्यवहाराचा आरोप; स्थानिक भूमिपुत्रांच्या रोजगारासाठी ‘किनेट’ कंपनीचे प्रतीकात्मक श्राद्ध
लातूर येथील मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरीत स्थानिक भूमिपुत्रांना आणि प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना रोजगार मिळत नसल्याच्या निषेधार्थ तसेच प्रकल्पातील कथित गैरव्यवहाराविरोधात ‘मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरी संघर्ष समिती’च्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले. या आंदोलनादरम्यान प्रकल्पाचे काम करणाऱ्या ‘किनेट’ (Kinet) कंपनीचे प्रतीकात्मक श्राद्ध घालून आंदोलकांनी केंद्र सरकार आणि प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला.
यावेळी बोलताना लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अभय साळुंके यांनी केंद्र सरकार आणि संबंधित कंपनीच्या कार्यपद्धतीवर गंभीर आरोप केले. “चेन्नई येथील भारत सरकारची रेल्वे कंपनी कमी खर्चात कोच तयार करण्यास सक्षम असतानाही १४ हजार कोटी रुपयांचे टेंडर परदेशी (रशियन) भागीदारी असलेल्या कंपनीला देण्यात आले. या प्रकल्पावर आतापर्यंत १४ हजार ४०० कोटी रुपये खर्च होऊनही प्रत्यक्षात एकही पूर्ण डबा तयार झालेला नाही; केवळ बाहेरून आणलेल्या अर्धवट बोगीचे वारंवार उद्घाटन केले जात आहे,” असा आरोप साळुंके यांनी केला.
तत्कालीन रेल्वेमंत्र्यांनी आणि पालकमंत्र्यांनी लाखो रोजगार निर्माण होतील असे आश्वासन दिले होते, मात्र लातूरच्या एमआयडीसीतून एक खिळाही खरेदी न करता सर्व साहित्य व मनुष्यबळ बाहेरून आणले जात असल्याचे ते म्हणाले. आयटीआय व तांत्रिक शिक्षण घेतलेल्या स्थानिक तरुणांना केवळ सुरक्षा रक्षक किंवा सफाई कामगार म्हणून कंत्राटी पद्धतीने राबवून घेतले जात असून, हक्काची नोकरी मागणाऱ्या विलास मुळे या तरुणाला कामावरून काढून टाकण्यात आले आहे. या अन्यायाविरोधात छत्रपती शिवाजी महाराज चौकात विलास मुळे आणि कपिल धावडे बेमुदत उपोषणाला बसणार असून, खासदार डॉ. शिवाजीराव काळगे यांच्या माध्यमातून हा प्रश्न लोकसभेत अधिक तीव्रतेने मांडला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय युवती अध्यक्ष सक्षणा सलगर यांनीही या आंदोलनात सहभागी होत केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका केली. हे आंदोलन कोणत्याही एका राजकीय पक्षाचे नसून कष्टकरी शेतकऱ्यांच्या हक्कासाठी सर्व पक्ष एकत्र आले असल्याचे त्यांनी सांगितले. “शेतकऱ्यांनी आपल्या घामाच्या जमिनी या प्रकल्पासाठी दिल्या, मात्र सरकारने हा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ दाखवून स्थानिक जनतेच्या स्वप्नांचा चुराडा केला आहे. केंद्र सरकारने या प्रकल्पात नेमका किती खर्च केला आणि किती स्थानिकांना रोजगार दिला, याची श्वेतपत्रिका काढून पारदर्शकता दाखवावी,” अशी मागणी सलगर यांनी केली. आज सिव्हिल इंजिनिअरिंग झालेले तरुण येथे स्लीपर उचलण्याचे काम करत असून, सरकारने लवकरात लवकर शेतकऱ्यांना आणि बेरोजगार तरुणांना न्याय न दिल्यास आगामी काळात जनता सरकारचा हिशोब चुकता करेल, असा इशाराही त्यांनी दिला.
या आंदोलनाप्रसंगी काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. शिवाजी जवळगेकर, राष्ट्रवादी काँग्रेस युवक शहर जिल्हाध्यक्ष प्रवीण साळुंखे, जिजाऊ ब्रिगेड प्रदेश प्रवक्ता रंजना हासुरे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) धाराशिव प्रवक्ता जगदीश पाटील यांच्यासह सचिन औरंगे, विलास मुळे, ओमकार भोईबार, कपिल धावडे, डॉ. दिनेश नवगिरे, अमोल कांबळे, प्रवीण सूर्यवंशी, गोपीनाथ लोटकर, राम पंढरी लोटकर, परमेश्वर खैरे, रंगनाथ सरोदे, अफजल सय्यद, शिवाजी सरोदे, मेहबूब सय्यद, मेहबूब शेख, याकुब सय्यद, फत्तु सय्यद, मैनोद्दीन सय्यद, सतीश पांढरे, बाबुसाहेब पांढरे, उत्तम पांढरे, अच्युत पांढरे, शिवाजी पिटले, किशन पिटले, भागवत पिटले, राजुभाऊ पिटले, रघुनाथ पिटले, युनुस सय्यद, दगडू सय्यद, रामलिंग म्हस्के, परमेश्वर गवळी आणि स्थानिक शेतकरी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments are closed.