…त्यामुळे राज्याची होत असलेली बदनामी थांबेल! चाकण एमआयडीसी, हिंजवडी आयटी हब येथील समस्यांवरून आदित्य ठाकरे यांचे मुख्यमंत्र्यांना स्मरणपत्र

चाकण एमआयडीसी आणि हिंजवडी आयटी हबमधील पायाभूत सुविधांच्या समस्यांवरून शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. या भागातील नागरिक, उद्योजक आणि कर्मचाऱ्यांकडून सातत्याने तक्रारी आणि पाठपुरावा होत असूनही प्रश्न मार्गी लागत नसल्याचे त्यांनी पत्रातून निदर्शनास आणून दिले आहे. बैठकीच्या माध्यमातून हे प्रश्न सुटू शकतात. त्यामुळे राज्याची होत असलेली बदनामी थांबेल असेही त्यांनी या पत्राच्या माध्यमातून म्हटले आहे.

आदित्य ठाकरे यांनी प्रामुख्याने चार महत्त्वाच्या समस्यांकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले आहे. यामध्ये चाकण आणि हिंजवडी परिसरातील रस्ते खड्डेमुक्त करावेत. तसेच वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अधिक वाहतूक पोलिसांची नियुक्ती करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. त्याचबरोबर हिंजवडी परिसरातील नागरिकांना नियमित पाणीपुरवठा व्हावा यासाठी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) उभारण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे.

परिसरातील कचऱ्याची समस्या सोडवण्यासाठी योग्य घनकचरा व्यवस्थापन व्यवस्था उभारण्याची मागणी देखील त्यांच्याकडून करण्यात आलेली आहे. चाकण एमआयडीसी परिसरातील वीजपुरवठ्याशी संबंधित अडचणी दूर करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

महाराष्ट्रातील अनेक औद्योगिक वसाहतींमध्ये अशाच प्रकारच्या समस्या असल्याचे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. चाकण आणि हिंजवडी ही महाराष्ट्राच्या आर्थिक आणि औद्योगिक विकासाला हातभार लावणारी महत्त्वाची केंद्रे आहेत. मात्र, गेल्या काही काळात येथील सुविधा आणि पायाभूत सुविधांचा दर्जा घसरत असल्याने राज्याच्या प्रतिमेला धक्का बसत असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.

या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी एक बैठक घ्यावी आणि दर महिन्याला या प्रश्नांवर झालेल्या कार्यवाहीचा आढावा घ्यावा, अशी सूचना आदित्य ठाकरे यांनी केली आहे. उद्योगांच्या माध्यमातून रोजगारनिर्मिती करणारे उद्योजक आणि राज्याच्या अर्थव्यवस्थेत योगदान देणारे कर्मचारी यांच्या आंदोलनांकडे दुर्लक्ष करण्याऐवजी सरकारने त्यांच्या समस्या गांभीर्याने सोडवाव्यात, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

Comments are closed.