पाण्यासाठी जीवघेणी कसरत; हाडगा गावात ‘तीन दिवसांत पाच घागरी’चे संकट! आबालवृद्धांसह महिलांची घागरभर पाण्यासाठी रात्रंदिवस वणवण
निलंगा तालुक्यातील हाडगा उमरगा गावात पाणीटंचाईने कळस गाठला असून, गावात पाणी येताच घागर भरण्यासाठी आबालवृद्धांसह महिलांची अक्षरशः झुंबड उडत आहे. पाण्याच्या प्रत्येक थेंबासाठी सुरू असलेली ही जीवघेणी धावपळ आणि कसरत पाहता, प्रशासनाच्या उपाययोजनांचे धिंडवडे निघाल्याचे चित्र समोर आले आहे. अवघ्या तीन दिवसांत एका कुटुंबाला केवळ पाचच घागरी पाणी मिळत असल्याने ग्रामस्थांचे जगणे मुश्कील झाले आहे.
विंधन विहिरीवर बोरचे पाणी सोडल्यानंतर जीव भांड्यात घालून नागरिकांना पाणी भरावे लागत आहे. पिण्याच्या पाण्यासोबतच सांडपाण्यासाठीही महिलांना भटकंती करावी लागत आहे. उन्हाळा अद्याप दूर असला, तरी त्यापूर्वीच गावात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. परिणामी, कष्टकऱ्यांना आपला रोजगार आणि कामे सोडून पाण्यासाठी रात्रंदिवस घागरींच्या रांगेत तिष्ठत बसावे लागत आहे.
गावातील सरपंचाचा कालावधी संपला असून, सध्या परिस्थितीला गाव वाऱ्यावर सोडल्यासारखी अवस्था आहे. दुसरीकडे, नियुक्त प्रशासक महिन्यातून केवळ एक ते दोन वेळाच गावात हजेरी लावत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून होत आहे. प्रशासकीय स्तरावर पाणीटंचाई निवारणासाठी कोणतीही ठोस पावले उचलली जात नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. शासकीय यंत्रणेच्या या सपशेल दुर्लक्षामुळे हाडगा उमरगावासीयांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष आणि पाण्यासाठी होत असलेली वणवण ही अतिशय गंभीर बाब असून याकडे लोकप्रतिनिधी व प्रशासक प्रशासकीय यंत्रणा दुर्लक्ष करत आहे असा आरोप गावातील नागरिक यांनी केला आहे. पाण्याच्या उपाययोजना बॅनरवर दाखवून लोकांना प्रशासन व लोकप्रतिनिधी वेड्यात काढत आहेत त्यावर ठोस अशी उपाययोजना करत नाहीत असा आरोप गावातील अनेक नागरिक करत आहेत.
Comments are closed.