बेन स्टोक्सचे आयपीएल 2027 ऑक्शनसाठी रजिस्ट्रेशन; 12 बांगलादेशी खेळाडूही शर्यतीत!
आयपीएल २०२७ चा मिनी लिलाव डिसेंबर महिन्यात गोवा येथे होणार आहे. या लिलावात अनेक मोठे खेळाडू सहभागी होणार आहेत. यासाठी इंग्लंडचा माजी कर्णधार बेन स्टोक्सनेही रूची दाखवली आहे. त्याने आपल्या नावाची नोंदणी केली आहे. त्यासाठी त्याने आपली मूळ किंमत किमान २ कोटी रूपये निश्चित केली आहे.
क्रिकबझच्या वृत्तानुसार, या आयपीएल लिलावासाठी १२ बांगलादेशी खेळाडूंनीही नोंदणी केली आहे. यामध्ये मात्र अनुभवी वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमान आणि माजी कर्णधार शाकिब अल हसन यांचा समावेश नाही. तसेच या लिलावासाठी एकूण १२२० नावे नोंदली गेली आहेत.
मेगा लिलावात सहभागी न होता स्टोक्सला कशी मिळाली संधी?
स्टोक्सने २०२५ च्या मेगा लिलावात भाग घेतला नसल्यामुळे त्याच्या नोंदणीबद्दल शंका निर्माण झाली होती. बीसीसीआयच्या नियमानुसार, कोणत्याही पदेशी खेळाडूला मेगा लिलावासाठी नोंदणी करणे बंधनकारक आहे. जर एखाद्या पदेशी खेळाडूने मेगा लिलावात आपले नाव नोंदवले नाही, तर तो पुढील वर्षीच्या लिलावात सहभागी होऊ शकत नाही. त्यामुळे स्टोक्सचे नाव चर्चेचा विषय ठरले. पुढे अशी माहिती येत आहे की, त्याला या वेळी लिलावात सहभागी होण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांकडून परवानगी मिळाली आहे.
३५ वर्षीय अष्टपैलूने याचवर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. तसेच त्याच्यासाठी आयपीएल काही नवे नाही. त्याने तीन आयपीएल फ्रॅंचायझींचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याने २०१७ मध्ये रायझिंग पुणे सुपरजायंट्स, २०१८ ते २०२१ दरम्यान राजस्थान रॉयल्स आणि २०२३ मध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळला.
स्टोक्सने पाच आयपीएल हंगामांमध्ये खेळताना एकूण ४५ सामने खेळले. यामध्ये त्याने ९३५ धावा केल्या आणि २८ विकेट्स घेतल्या.
आयपीएल लिलावासाठी डझनभर बांगलादेशी खेळाडूंची नोंदणी
आगामी आयपीएल लिलावासाठी जवळपास १२ बांगलादेशी खेळाडूंनी नावनोंदणी केली आहे. यामध्ये हसन महमूद, परवेझ होसैन इमॉन, रिपन मंडोल, रिशाद होसैन, सैफ हसन, शक महेदी हसन, शमीम होसैन, शोरीफुल इस्लाम, तनझिम हसन साकिब, तौहीद हृदय, मोहम्मद रुबेल आणि तस्किन अहमद यांचा समावेश आहे.
बीसीसीआयने जाहीर केल्यानुसार, या लिलावात ९३९ भारतीय आणि २८१ पदेशी खेळाडू आहेत. यासाठी फ्रॅंचायझींकडे एकूण ६६ जागा रिकाम्या असून त्यापैकी २५ जागा परदेशी खेळाडूंसाठी उपलब्ध आहेत.
Comments are closed.