ग्रामसभेचा ठराव नसताना बेकायदा रस्त्याचे काम, नांदगावच्या 500 ग्रामस्थांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार
पालघर तालुक्यातील नांदगावतर्फे तारापूर ग्रामपंचायतीच्या हद्दीत जिंदाल कंपनीने बेकायदा रस्त्याचे काम सुरू केल्याची तक्रार 500 हून अधिक ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. विशेष म्हणजे या रस्त्याच्या बांधकामासाठी ग्रामसभेचा ठराव, ग्रामपंचायतीची अधिकृत मंजुरी तसेच आवश्यक प्रशासकीय मान्यता घेण्यात आली नसल्याचा आरोप सुमित ठाकूर, जितेश पाटील, शर्मिला राऊत, हार्दिक पाटील, पंकज ठाकूर, प्रतीक मोरे यांच्यासह ग्रामस्थांनी केला आहे.
नांदगावतर्फे तारापूर ग्रामपंचायतीच्या हद्दीत जिंदाल कंपनीमार्फत नवीन रस्ता तयार करण्याचे काम सुरू आहे. हा रस्ता ग्रामस्थांच्या किंवा गावाच्या सार्वजनिक सोयीसाठी नसून संबंधित खासगी कंपनीच्या बंदर उभारणीसाठी मालवाहतूक सुलभ व्हावी, या उद्देशाने तयार केला जात असल्याचा आरोपही निवेदनातून करण्यात आला आहे. कंपनीच्या व्यावसायिक फायद्यासाठी गावातील जागेचा वापर केला जात असल्याने न्या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. हा रस्ता गाव नकाशात किंवा ग्रामपंचायतीच्या रस्ते व वहिवाट नोंदवहीत नोंदवलेला नाही. खासगी शेतजमिनीवर अथवा नोंद नसलेल्या जागेवर संबंधित मालकांची परवानगी आणि आवश्यक शासकीय प्रक्रिया पूर्ण न करता रस्ता बांधणे बेकायदेशीर असल्याची तक्रार ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी डॉ. इंदूराणी जाखड यांच्याकडे केली आहे.
गावातील अंतर्गत रस्ते व्हावेत यासाठी चार-पाच वर्षांपासून निधीची मागणी केली होती. मात्र सरकारने निधी दिला नाही. त्यामुळे आम्ही जिंदाल कंपनीच्या सीएसआर फंडातून हे काम करत आहोत. तक्रारदारांपैकी काहींनी त्यांच्या मर्जीतील एजन्सीला रस्त्याचे काम द्यावे अशी मागणी होती. मात्र कंपनीने तसे न केल्याने तक्रारी सुरू आहेत, असे सरपंच समीर मोरे यांनी सांगितले.
Comments are closed.