समृद्धी महामार्गावर मेहकर जवळ भीषण अपघात; एकाचा जागीच मृत्यू, चौघे किरकोळ जखमी

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

समृद्धी महामार्गावर मुंबई कॉरिडॉरवर २५ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री १२.३० वाजताच्या सुमारास ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात झाला. ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात ट्रॅव्हल्स बसने समोरून येणाऱ्या वाहानाला धडक दिली. या धडकेमुळे बसच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यानंतर बस बाजूच्या लोखंडी डिव्हायडरला धडकून दोन्ही डिव्हायडरच्या मध्ये घुसली. या अपघातात गौरव शरदचंद्र पांडे (वय २९, तुमसर, भंडारा) यांचा जागीच मृत्यू झाला असून चार प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.

अपघाताबाबत मिळालेल्या माहितीनुसार, ट्रॅव्हल्स बस क्रमांक MH 09 GJ 7315 ही नागपूर येथून मुंबईकडे जात होती. दरम्यान, बस चालक शिवानंद हांचिनायटी (वय ३५, रा. नागपूर) हे समोरील वाहनाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करीत असताना बसची समोरील वाहनाला धडक बसली. त्यामुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस बाजूच्या लोखंडी डिव्हायडरला धडकून दोन्ही डिव्हायडरच्या आत जाऊन अपघातग्रस्त झाली.

या अपघातात गौरव पांडे हे बसच्या डाव्या बाजूने बाहेर फेकले गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर ओमप्रकाश यादव (वय ५८, रा. नागपूर), इब्राहिम अहमद खान (वय ३६, रा. नवी मुंबई), इशिका रामदास कावलकर (वय ३६, रा. नागपूर) आणि मीनाक्षी राजगुरू (वय ६२, रा. नागपूर) हे चार प्रवासी किरकोळ जखमी झाले.

अपघाताची माहिती मिळताच मलकापूर पोलीस तातडीने घटनास्थळी रवाना झाले. चारही जखमी प्रवाशांना तातडीने सरकारी रुग्णवाहिकेद्वारे ग्रामीण रुग्णालय, मेहकर येथे उपचारासाठी पाठविण्यात आले. तसेच मृत गौरव पांडे यांचा मृतदेहही सरकारी रुग्णवाहिकेतून ग्रामीण रुग्णालय, मेहकर येथे रवाना करण्यात आला. ट्रॅव्हल्स बसमधील इतर प्रवाशांना सरकारी वाहनातून आयसी-११ फरदापूर टोल नाका येथे सुरक्षितपणे सोडण्यात आले. या अपघातात ट्रॅव्हल्सचा चालक आणि वाहक यांना कोणतीही दुखापत झाली नाही.

Comments are closed.