श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेची २८ नोव्हेंबरला प्रक्षाळपूजा, दर्शनाच्या वेळेत बदल

कार्तिकी यात्रेच्या सोहळ्यानंतर करण्यात येणारी श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेची प्रक्षाळपूजा शनिवार, दि. २८ नोव्हेंबर रोजी संपन्न होणार आहे. या प्रक्षाळपूजेनिमित्त श्रींच्या दर्शनाच्या वेळेत बदल करण्यात आला असून, काही कालावधीत पदस्पर्श दर्शन बंद राहणार आहे. तथापि, मुखदर्शन नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहे.

दरवर्षी कार्तिकी यात्रेच्या कालावधीत भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. भाविकांना जास्तीत जास्त वेळ दर्शनाचा लाभ घेता यावा, यासाठी योग्य मुहूर्त व दिवस पाहून श्रींचा पलंग काढण्यात येतो. यंदा दि. १४ नोव्हेंबर रोजी श्रींचा पलंग काढण्यात आला होता. त्यानंतर काकडा आरती, पोशाख, धुपारती, शेजारती आदी राजोपचार बंद करून नित्यपूजा, महानैवेद्य व गंधादक्षा हे राजोपचार सुरू ठेवण्यात आले होते. आता हे सर्व राजोपचार पूर्ववत सुरू करण्यासाठी शनिवार, दि. २८ नोव्हेंबर रोजी श्रींची विधिवत प्रक्षाळपूजा करण्यात येणार आहे, अशी माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी श्रीकांत यादव यांनी दिली.

प्रक्षाळपूजेनिमित्त शनिवार, दि. २८ नोव्हेंबर रोजी श्रींचे पदस्पर्श दर्शन पहाटे ५.०० ते दुपारी १२.२०, दुपारी १२.३० ते २.१०, सायंकाळी ५.३० ते ६.४५ आणि रात्री ७.१० ते ११.३० या वेळेत सुरू राहणार आहे. तर दुपारी १२.२० ते १२.३०, दुपारी २.१० ते सायंकाळी ५.३० आणि सायंकाळी ६.४५ ते ७.१० या वेळेत श्रींचे पहिले स्नान, महाअभिषेक, अलंकार, महानैवेद्य व धुपारती हे धार्मिक विधी संपन्न होणार असल्याने पदस्पर्श दर्शन बंद राहणार आहे. या कालावधीत भाविकांसाठी श्रींचे मुखदर्शन मात्र नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहे.

या प्रक्षाळपूजेच्या धार्मिक विधीमध्ये श्री विठ्ठलास ११ ब्रह्मवृंदांच्या हस्ते रुद्राभिषेक, तर श्री रुक्मिणी मातेस ११ ब्रह्मवृंदांच्या हस्ते पवमान अभिषेक करण्यात येणार आहे. तसेच श्री विठ्ठलाची प्रक्षाळपूजा मंदिर समितीचे सन्माननीय सदस्य अतुल शास्त्री भगरे गुरुजी यांच्या शुभहस्ते, तर श्री रुक्मिणी मातेची प्रक्षाळपूजा मंदिर समितीचे व्यवस्थापक प्रवीणकुमार घाम यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे,

भाविकांनी दर्शनाच्या वेळेतील बदलाची नोंद घेऊन नियोजन करावे व मंदिर समितीस सहकार्य करावे, असे आवाहन श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने करण्यात येत असल्याचे यावेळी व्यवस्थापक प्रविणकुमार घम यांनी सांगितले

Comments are closed.