चाळीस वर्षे लिहूनही माझी दखल घेतली नाही! शरणकुमार लिंबाळे यांची खंत
‘गेली 40-45 वर्षे मी लिहीत असून आतापर्यंत 46 पुस्तके लिहिली आहेत. भारतातील अन्य भाषांमध्ये 90 पुस्तके आहेत. राष्ट्रीय पातळीवरचा सरस्वती सन्मान मला मिळाला आहे. तरीही माझी दखल घेतली गेली नाही’ अशी खंत शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. शरणकुमार लिंबाळे यांनी व्यक्त केली.
लिंबाळे यांची साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी एकमताने निवड झाल्यानंतरही साहित्यिक व सामाजिक वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर ‘बीबीसी मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत लिंबाळे यांनी विविध मुद्दय़ांवर आपली भूमिका स्पष्ट केली. उशिरा का होईना आपली दखल घेतली गेल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. ‘आतापर्यंतच्या नकाराला स्वीकृती मिळाली आहे. मला काव्यगत न्याय मिळालेला आहे. यापुढे माझ्या आवाजाला आणखी धार येईल,’ असे ते म्हणाले.
माझ्याबद्दल अनेकांना असुया
‘मराठी साहित्यात, दलित साहित्यात आणि चळवळीतही अनेक गट आहेत. प्रत्येक गट दुसऱया गटाशी स्पर्धा करत असतो, दुसऱयांना कमी लेखत असतो, संपवण्याचा प्रयत्न करतो, असे लिंबाळे म्हणाले.
धर्मांतर ही अंगात शर्ट घालणे आणि काढून ठेवणे इतकी सोपी प्रक्रिया नाही. संपूर्ण बौद्धमय व्हायला वेळ लागतो. मी अशा काळात जगलो आहे की माझी मानसिकता हिंदुत्ववादीही होती आणि आंबेडकरवादीही होती. किचनमध्ये हिंदूंचे देव आणि बाहेर बाबासाहेबांचा पह्टो अशी पिढीही झालेली आहे. आता बदल होत आहे. नव्या बौद्ध समाजानं जुन्या पिढीला समजून घेतलं पाहिजे.
मनातला मनु बाहेर काढायचा असेल तर संवाद साधावा लागेल!
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जवळ असल्याच्या आरोपावरही ते बोलले. ‘इथला प्रतिगामी समाज बाबासाहेबांना समजून घ्यायला उत्सुक आहे हे मला महत्त्वाचे वाटते. आमच्या काळात देशाने फक्त राज्यघटना स्वीकारली. बाबासाहेबांना स्वीकारले नव्हते. आता ती मानसिकता तयार झाली आहे. सवर्ण समाज आपल्याशी संवाद करायला उत्सुक असेल तर आपण त्यांच्याशी बोललं पाहिजे. देशात सर्वात मोठी लोकसंख्या हिंदू आहे. त्यांच्याशी संवाद ठेवला नाही तर मी कोणाशी बोलणार,’ असा सवाल त्यांनी केला.
Comments are closed.