‘शक्तिपीठ’च्या मोजणीला विरोध कायम! विट्यात सलग दुसऱ्या दिवशी आंदोलन चिघळले
शक्तिपीठ महामार्गाच्या मोजणीविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला दुसऱ्या दिवशीही प्रचंड प्रतिसाद मिळाला. मात्र, आंदोलनाचे नेते ऍड. दीपक लाड यांना अटक केल्याचे समजताच आंदोलन चिघळले. खानापूर आणि कडेगाव तालुक्यातील हजारो शेतकरी व आंदोलकांनी विटा पोलीस ठाण्याकडे धाव घेत घेराव घातला. त्यामुळे पोलीस ठाणे परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले.
विटा तालुक्यातील नेवरी येथील सुरू असलेल्या मोजणीला विरोध करण्यासाठी गेलेले महामार्गविरोधी संघर्ष समितीचे नेते ऍड. दीपक लाड यांना पोलिसांनी अटक केली. याची माहिती मिळताच खानापूर आणि कडेगाव तालुक्यातील हजारो शेतकरी व आंदोलकांनी विटा पोलीस ठाण्याकडे धाव घेत घेराव घातला. त्यामुळे पोलीस ठाणे परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले.
शक्तिपीठ महामार्गामुळे शेतकऱ्यांच्या जमिनी बाधित होण्याची शक्यता असल्याने या प्रकल्पाला परिसरातील शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे. नेवरी येथे सुरू असलेली महामार्गाची मोजणी बंद पाडण्याच्या मागणीसाठी ऍड. लाड हे शेतकऱ्यांसह घटनास्थळी गेले होते. यावेळी पोलिसांनी त्यांना अटक केली. त्यानंतर खानापूर आणि कडेगाव तालुक्यातील शेतकरी मोठय़ा संख्येने विटा पोलीस ठाण्यात दाखल झाले. संतप्त आंदोलकांनी अटकेच्या निषेधार्थ पोलीस ठाण्याला घेराव घातला. हजारोंच्या संख्येने आंदोलक एकत्र आल्याने परिसरात तणाव निर्माण झाला होता.
शक्तिपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध असतानाही प्रशासनाने आता मोजणीसाठी वेगळीच मोर्चेबांधणी केल्याचे भाळवणी (ता. खानापूर) येथील घटनेतून समोर आले आहे. नेवरी (ता. कडेगाव) परिसरात शेतकरी मोजणी रोखण्यासाठी ठाण मांडून असताना प्रशासनाने वडियेरायबाग येथील भगत मळ्याजवळ भाळवणी हद्दीत अचानक मोजणीची मोहीम राबवली. तब्बल 100 हून अधिक पोलिसांच्या बंदोबस्तात शेतकऱ्यांचा विरोध डावलून मोजणी उरकण्यात आली. भगत मळ्याजवळ मोजणी सुरू झाल्याची माहिती मिळताच शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. शेतकरी व महिलांनी मोजणीला तीव्र विरोध केला. मात्र, आधीच मोठा पोलीस फौजफाटा तैनात असल्याने परिस्थिती तणावपूर्ण बनली. यावेळी शेतकरी आणि पोलिसांमध्ये जोरदार धरपकड झाली. विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले, तर महिला आणि अन्य शेतकऱ्यांना घटनास्थळीच रोखून धरण्यात आले. शेतकऱ्यांचा विरोध सुरू असतानाच प्रशासनाने मोजणीचे काम पूर्ण केले. त्यानंतर शेतकऱ्यांची सुटका करण्यात आली.
शेतकऱ्यांचा विरोध, पोलिसांचा मोठा बंदोबस्त आणि धरपकड अशा वातावरणात झालेल्या या मोजणीने शक्तिपीठ महामार्गाचा संघर्ष पुन्हा ऐरणीवर आला आहे.
Comments are closed.