पंढरपुरात कॉरिडॉरबाधितांचा धडक मोर्चा, ‘नो कॉरिडॉर, नो डीपी’च्या घोषणा
पंढरपूर कॉरिडॉरबाधितांनी आजपर्यंत वेगवेगळ्या पातळ्यांवर शासनाला हजारो निवेदने, हरकती दिल्या आहेत. मात्र, त्याचा काहीही विचार न करता, सरकार कॉरिडॉर पुढे रेटत आहे. जबरदस्तीने भूसंपादनाच्या नोटिसा काढल्या गेल्या आहेत. या नोटिसांना उत्तर देण्यासाठी कॉरिडॉरबाधित नागरिकांनी ‘पंढरपूर तीर्थक्षेत्र बचाव समिती’च्या वतीने आज कॉरिडॉरविरोधात भूसंपादन ऑफिसवर धडक मोर्चा काढला. यावेळी ‘नो कॉरिडॉर, नो डीपी’च्या घोषणा देण्यात आल्या.
या मोर्चासाठी डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांच्या ‘विराट हिंदुस्थान संगम’ या हिंदू हितकारी लढाऊ संघटनेचे प्रवक्ते, उच्च न्यायालयाचे वकील जगदीश शेट्टी उपस्थित होते.
‘संबंधित कायद्यांची पूर्ण पायमल्ली करून सरकार या नोटिसा पुढे रेटत आहे. कॉरिडॉरमध्ये वारकरी आणि भाविक यांचे काहीही हित नाही. एक-दोन दिवसांच्या वारीचे निमित्त करून भरलेली बाजारपेठ पाडणे योग्य नाही. कॉरिडॉरची घोषणा झाल्यापासून महाराष्ट्रात दुष्काळ आणि दुर्घटना वाढल्या आहेत. कॉरिडॉर हा महाराष्ट्राला अपशकुन आहे,’ असे पंढरपूर तीर्थक्षेत्र बचाव समितीचे प्रमुख नेते अभयसिंह इचगावकर यांनी सांगितले. या मोर्चामध्ये महिलांचा मोठा सहभाग होता. अनेक बाधितांनी या वेळेसही आपल्या हरकती सादर केल्या.
पुढील दोन-तीन दिवसही लेखी निवेदनातून शासनाला मोठा विरोध करण्यात येणार आहे. यावेळी आंदोलकांनी ‘एकच जिद्द, कॉरिडॉर रद्द’, ‘कॉरिडॉर रद्द झालाच पाहिजे!’ अशा घोषणा दिल्या.
श्री संत नामदेव महाराजांच्या समाधीला वंदन करून मोर्चाला प्रारंभ झाला. या मोर्चास बाबाराव महाजन, ह.भ.प. वडगावकर महाराज, ह.भ.प. माउली महाराज गुरव, बालाजी महाजन, रा. पा. कटेकर, वीर महाराज, महिला आघाडीप्रमुख सुलभा वट्टमवार, गणेश लंके, अनिल मिसाळ, प्राजक्ता बेणारे, गीतांजली पिंपळनेरकर, विनय लाड, आशीष राजहंस, विवेक बडवे, ओंकार कुलकर्णी आदींसह कॉरिडॉरबाधित मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
कॉरिडॉरबाधितांनी घाबरून जाऊ नये. आपण रामसेतू, नटराज, चिदंबर मंदिर यांसारखे अनेक लढे यशस्वी केले आहेत. पंढरपूर
कॉरिडॉरची लढाईसुद्धा आपण यशस्वी करून दाखवू. सध्या सुरू असलेली सरकारची प्रोसिजर कायद्याला धरून नाही. – जगदीश शेट्टी, प्रवक्ते, विराट हिंदुस्थान संगम
Comments are closed.