आदित्य ठाकरे तिसऱ्यांदा देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, नेमकं कारण काय?
मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतली. मुंबईतील विविध समस्या आणि मतदारसंघातील प्रश्नासंदर्भात ही भेट घेतल्याची माहिती आहे. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाल्यानंतर आदित्य ठाकरे यांची ही तिसरी भेट आहे. देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत, म्हणून राज्यातील, मुंबईतील प्रश्न त्यांच्यासमोर मांडत राहणार असल्याची प्रतिक्रिया दोन दिवसांपूर्वी आदित्य ठाकरे यांनी दिली होती. त्यानंतर आज पुन्हा आदित्य ठाकरे हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी मंत्रालयात दाखल झाले.
यापूर्वी आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दोनवेळा भेट घेतली होती. नागपूर हिवाळी अधिवेशनात आदित्य ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंसोबत जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली होती.
आज मुंबईत सध्या गाजत असलेला टोरेस घोटाळा याबाबतही आदित्य ठाकरे मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत.
सामनातून कौतुक
दरम्यान, काही दिवसापूर्वी दैनिक सामनातून देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक करण्यात आलं होतं. “देवा भाऊ अभिनंदन !” या शीर्षकाखाली देवेंद्र फडणवीस यांच्या कामाचं कौतुक करणारा लेख सामनामध्ये छापून आला होता. नववर्षाला देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोलीचा दौरा केला होता. तिथे केलेल्या विकासकामाचा शुभारंभ केला होता. नक्षलवादी जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गडचिरोलीला पोलाद शहर करण्याचा केलेला निर्धार आणि नक्षलवाद्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर केलेलं आत्मसमर्पण, या सगळ्याचं सामनातून कौतुक करण्यात आलं होतं. त्यावेळी ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अनेक प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आणि भाजपसोबत जवळीक वाढवणारी दिसत असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या.
आदित्य ठाकरे काय म्हणाले?
वरळीत राहणाऱ्या पोलीस पत्नी आणि गृहनिर्माणबाबत फडणवीसांसोबत चर्चा झाल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले. पोलीस निवासात राहणाऱ्या निवृत्त पोलिसांना दंड लावला आहे, तो पर स्केवर फूट 20 रुपयांचा दर 150 रुपये केला आहे. तो कमी करावा अशी विनंती फडणवीसांकडे केल्याचं ते म्हणाले. पोलिसांच्या अनेक पिढ्यांनी मुंबईची सेवा केली आहे. निवृत्त पोलिसांना मुंबईतच घरं कशी देता येतील त्याबाबत चर्चा केली. शिवाय मुंबई पोलिसांची निवासस्थानं आहेत त्यांच्या डागडुजीचा प्रश्न फडणवीसांसमोर मांडल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले.
सर्वांसाठी पाणी ही योजना आम्ही आणली होती. कोणत्याही सोसायटीचं लीगल स्टेटस न पाहता त्यांना पाणी मिळणं हे हक्काचं आहे, सर्वांसाठी पाणी ही योजना मुंबईत लागू करावी, त्यावरील स्थगिती हटवावी अशी मागणी आदित्य ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांकडे केली. टोरेस घोटाळ्याप्रकरणी कारवाईची मागणीही आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांकडे केली.
मुख्यमंत्र्यांचे आजचे कार्यक्रम
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गेले काही दिवस मंत्रालयात विविध विभागाच्या बैठका घेत आहेत. मुख्यमंत्र्यांकडून आज देखील 100 दिवस आराखड्यासंदर्भात बैठक होत आहे. मुख्यमंत्र्यांकडून आज माहिती तंत्रज्ञान, नगरविकास, उद्योग, कामगार, मृदा आणि जलसंधारणासंदर्भात प्रेझेन्टेशन होणार आहे.
हेही वाचा:
अधिक पाहा..
Comments are closed.