मी कसंतरी निवडून आलो, भाजपवाल्यांनी काम केलं नाही; शिंदेंच्या आमदाराची महायुतीत थेट नाराजी

नांदेड: राज्यातील विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना शिंदे गट आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीने एकत्र येत महायुती म्हणून निवडणुका लढवल्या. यावेळी महायुतीला अनपेक्षित यश मिळालं असून तब्बल 237 जागांवर विजय मिळाला आहे. त्यामध्ये, भाजपच्या 132 तर शिंदेंच्या शिवसेनेचे 57 आमदार निवडून आले आहेत. त्यापैकीच एक असलेल्या आमदार बालाजी कल्याणकर (Balaji kalyankar) यांनी महायुतीत थेट नाराजी व्यक्त केली आहे. विधानसभा निवडणुकीत भाजप पदाधिकाऱ्यांनी माझं काम न केल्यामुळेच माझं मताधिक्य घटल्याचं कल्याणकर यांनी म्हटलं. विधानसभा निवडणुकीत मला 50 हजारांचे लीड अपेक्षित असताना केवळ साडेतीन हजारांचे लीड मिळाल्याचंही त्यांनी सांगितलं. दरम्यान, विधानसभा निवडणुकानंतर (Election) आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी रणधुमाळी सुरू असतानाच बालाजी कल्याणकर यांच्या वक्तव्याने महायुतीत धुसफूस होण्याची शक्यता आहे.

नांदेड जिल्ह्यातील नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बालाजी कल्याणकर यांनी महायुतीतील घटकपक्षाबाबत थेट नाराजी व्यक्त केली आहे. विधानसभा निवडणुकीत महायुतीने दणदणीत विजय मिळविला. परंतु आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी  महायुतीच्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फेरी झडताना दिसत आहेत. विधानसभा निवडणुकीत भाजपामध्ये नव्याने आलेल्या लोकांनी माझे काम केले नाही. माझ्या विरोधात भाजपाच्याच लोकांनी पैसे वाटले, मला 50 हजारांची लीड मिळणे अपेक्षित असताना केवळ साडेतीन हजारांची लीड मिळाली. त्यामुळे माझा निसटता विजय झाल्याची खदखद शिंदे गटाचे आमदार बालाजी कल्याणकर यांनी व्यक्त केली.

भाजपाच्या नेत्यांवर आणि पदाधिकाऱ्यांनावर आमदार कल्याणकर यांनी गंभीर आरोप केले आहेत. माझं मतदारसंघात काम चांगलं असल्याने मी जनतेच्या आशीर्वादाने निवडून आलो आहे, असेही ते म्हणाले. महायुती म्हणून भाजपाने सहकार्य करणे आवश्यक होते. परंतु, तसे विधानसभा निवडणुकीत झाले नाही. त्यामुळे मला विधानसभा निवडणुकीत अत्यंत कमी लीड मिळाल्याची खंत आमदार बालाजी कल्याणकर यांनी व्यक्त केली. त्यामुळे, आगामी काळात नांदेड जिल्ह्यात महायुतीमधला वाद अधिक वाढण्याची शक्यता आहे. तसेच, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही महायुतीत बिघाडी पाहायला मिळण्याची शक्यता दिसून येते.

दरम्यान, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाने मुंबईत स्वतंत्रपणे निवडणुका लढवणार असल्याचे म्हटले. तर, महायुतीने एकत्रितपणे निवडणुका लढवण्याचा निर्धार केला आहे. याबाबत, महायुतीचे प्रमुख नेते बैठक घेऊन निर्णय जाहीर करतील. मात्र, तत्पूर्वीच स्थानिक स्तरावर महायुतीमधील नाराजी उघड होताना दिसून येते.

हेही वाचा

अधिक पाहा..

Comments are closed.