संजय राऊतांचा शरद पवारांवर हल्लाबोल, नातू ढाल म्हणून पुढे सरसावला, भाजपला वादात खेचलं

मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्तुतीसुमनांचा वर्षाव केल्यामुळे ठाकरे गटाच्या टीकेचे धनी झालेल्या शरद पवार यांच्या बचावासाठी त्यांचा नातू आणि आमदार रोहित पवार (Rohi Pawar) पुढे सरसावले आहेत. त्यांना या सगळ्या वादासाठी अप्रत्यक्षपणे भाजपला जबाबदार धरले आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शरद पवार यांना लक्ष्य केले होते. महाराष्ट्राशी बेईमानी करणाऱ्या आणि बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना फोडणाऱ्या एकनाथ शिंदे यांना आपल्या हाताने शरद पवार (Sharad Pawar) यांनी पुरस्कार देणे योग्य नाही. शरद पवार यांना दिल्लीतील राजकारणासाठी या गोष्टी गरजेच्या असतील. पण आम्हालादेखील राजकारण कळते माननीय पवारसाहेब, असे संजय राऊत यांनी म्हटले. त्यांच्या या टीकेला रोहित पवार यांनी प्रत्युत्तर दिले.

रोहित पवार यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत म्हटले आहे की, दिल्लीतील कार्यक्रमावरून संजय राऊत साहेबांसारख्या मोठ्या राजकीय नेत्याने दिलेली प्रतिक्रिया आश्चर्यकारक आहे. महाराष्ट्राला स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या सुसंस्कृत राजकारणाची परंपरा लाभली असून स्व. बाळासाहेब ठाकरे, आदरणीय पवार साहेब यांच्यासारख्या जेष्ठ नेत्यांनी ही परंपरा पुढे नेली. सामाजिक-सांकृतिक कार्यक्रमांना राजकीय मतभेदाचा कधीही अडसर ठरू दिला नाही. तसेच महाराष्ट्राची सामाजिक व सांकृतिक वीण अधिक घट्ट करण्यावर नेहमीच भर दिला. पण मागील दोन-तीन वर्षात भाजपाने कलुषित केलेले राजकारण, महाराष्ट्राच्या अस्मितेशी केलेली छेडछाड बघता यामुळंच संजय राऊत साहेबांनी तडकाफडकी ही प्रतिक्रिया दिली असावी, असे रोहित पवार यांनी म्हटले.

दरम्यान, संजय राऊतांच्या वक्तव्यानंतर शिंदे गटाचे मंत्री शंभुराज देसाई यांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडले. महाराष्ट्राच्या एका सुपुत्राने दुसऱ्या सुपुत्राचा सन्मान केला यात चुकीचं काय? संजय राऊत म्हणायचे शरद पवारांमुळे महाविकास आघाडी झाली हे आत्तापर्यंत ते बोलत होते. आता संजय राऊत याना वैफल्य आलं आहे. त्यांचं स्थान दिवसेंदिवस खाली जायला लागलं आहे. त्यामुळे त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. संजय राऊत स्वत:ला विश्वज्ञानी प्रवक्ते समजतात. त्यामुळे त्यांना वाटत त्यांनी जी भूमिका घेतली ती सर्वांनी घ्यावी. त्याना माझ स्पष्ट सांगणं आहे की, महाविकास आघाडीची आपल्याला भूमिका पटत नसेल तर लगेच बाहेर पडा, असे शंभुराज देसाई यांनी म्हटले.

संजय राऊत नेमकं काय म्हणाले?

संजय राऊत यांनी शरद पवार यांनी दिल्लीतील कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांच्यावर स्तुतीसुमने उधळल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. ज्यांनी महाराष्ट्राचं सरकार पाडलं, बेईमानी केली. त्यांच्या कार्यक्रमाला शरद पवारांनी जायला नव्हते पाहिजे. ही आमची भावना आहे. आम्ही महाराष्ट्रातील लोकांसमोर कोणत्या तोंडाने जाणार? राजकारणात कोणी कोणाचा शत्रू किंवा मित्र नसतो. पण ज्यांनी महाराष्ट्राची वाट लावली, आम्ही ज्यांना महाराष्ट्राचे शत्रू समजतो. त्यांच्यासोबत खुलेआम बसणे आणि त्यांना असे सन्मान आपल्या हातून देणं ही योग्य गोष्ट नसल्याचे संजय राऊत यांनी म्हटले.

https://www.youtube.com/watch?v=bv8ukowdt8m

आणखी वाचा

एकनाथ शिंदेंचा सत्कार अन् कौतुक ठाकरेंना झोंबलं; संजय राऊतांनी शरद पवारांना खडे बोल सुनावले

अधिक पाहा..

Comments are closed.