एकनाथ शिंदेंना पुरस्कार का दिला? राऊतांच्या राजकीय दलालीच्या आरोपावर संजय नहार काय म्हणाले?

मुंबई: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिल्लीतील नियोजित मराठी साहित्य संमेलनाच्यानिमित्ताने राजकीय दलाली सुरु असल्याचा गंभीर आरोप केला होता. कोणालाही कसलेही पुरस्कार देत आहेत, कोणाचे कसेही सत्कार करत आहेत. यांचा साहित्याशी संबंध काय आहे?, असा सवाल संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उपस्थित केला होता. त्यांच्या या टीकेला दिल्लीतील मराठी साहित्य संमेलनाची आयोजक असलेल्या सरहद संस्थेचे प्रमुख संजय नहार (Sanjay Nahar) यांनी उत्तर दिले.

एकनाथ शिंदे हे महादजी शिंदे यांच्या साताऱ्याच्या भूमीतून आले आहेत. एकनाथ शिंदे यांनी काश्मीर आणि पंजाबमध्ये महाराष्ट्र सदन बांधण्यासाठी प्रयत्न केले. त्यांनी ज्याप्रकारे काही कामं केली आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना आम्ही महादजी शिंदे यांच्या नावाचा पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला, असे स्पष्टीकरण संजय नहार यांनी दिले.

साहित्य महामंडळ ही एक स्वायत्त संस्था आहे. त्याचं उत्तर मी देतो. साहित्य महामंडळ स्वायत्त संस्था असल्याने ते दरवर्षी संमेलन घेण्यासाठी वेगळ्या संस्थेला वेगळ्या संस्थेला संमेलन घेण्यासाठी परवानगी देतात. यंदाचं मराठी साहित्य संमेलन सरहद संस्थेने आयोजित केले आहे. साहित्य संमेलनाच्या निमित्ताने पूर्व सत्कार ही परंपरा आहे. यावेळी महादजी शिंदे यांच्या नावाने पुरस्कार देण्यात आला कारण, ‘दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा’, असे महाराष्ट्रात म्हटले जाते. ही कवी कल्पना ज्यांच्यामुळे अस्तित्त्वात आली, ते महादजी शिंदे होते. महादजी शिंदे यांच्या नावाने सुरुवातीला एखाद्या लष्करी व्यक्तीला पुरस्कार द्यायचे ठरले होते. मात्र, सदानंद मोरे यांच्यासारख्या अभ्यासकांनी महादजी शिंदे यांचा अभ्यास केल्यावर लक्षात आले की, महादजी शिंदे कवी होते, ते ओव्या आणि अभंग लिहायचे. त्यांनी दिल्लीत महाराष्ट्राची एक चांगली प्रतिमा निर्माण केली. त्यामुळे त्यांच्या नावाने पुरस्कार देण्याचा निर्णय घेण्यात आला, असे संजय नहार यांनी म्हटले.

महाराष्ट्रात काहीही झालं तरी दिल्लीत महाराष्ट्र एक असतो. आपण एकमेकांशी कितीही भांडलो तरी दिल्लीच्या व्यासपीठावर आपण सर्वांनी एकत्र दिसणे गरजेचे आहे. यापूर्वीही साहित्य संमेलनावर गंभीर स्वरुपाची टीका झाली आहे. असले वादविवाद महाराष्ट्राच्या निकोप वाढीसाठी चांगले आहेत. संजय राऊत हे आमचे चांगले मित्र आहेत. त्यांना आम्ही साहित्य संमेलनाचे निमंत्रण दिले आहे, असे संजय नहार यांनी म्हटले.

संजय राऊत नेमकं काय म्हणाले?

दिल्लीतील साहित्य संमेलनाच्यानिमित्ताने राजकीय दलाली सुरु आहे. कोणालाही कसलेही पुरस्कार देत आहेत, कोणाचे कसेही सत्कार करत आहेत. यांचा साहित्याशी संबंध काय आहे? माझा आयोजकांना प्रश्न आहे, तुम्ही दिल्लीत दलाली करायला आला आहात का, काय साहित्याची सेवा करत आहात, कोण करतंय संमेलन आयोजित. हा भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा उपद्व्याप आहे. मराठीची काय सेवा करताय तुम्ही इकडे, महाराष्ट्राच्या मानेवर पाय ठेवणाऱ्यांचा तुम्ही सत्कार करताय. मी निमंत्रण असलं तरी या साहित्य संमेलनाला जाणार नाही. हे साहित्य संमेलन नसून दिल्लीतील राजकीय दलाली आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

https://www.youtube.com/watch?v=6ge53qoqrby

आणखी वाचा

एकनाथ शिंदेंचा सत्कार अन् कौतुक ठाकरेंना झोंबलं; संजय राऊतांनी शरद पवारांना खडे बोल सुनावले

अधिक पाहा..

Comments are closed.