धनंजय मुंडे सलग तिसऱ्या कॅबिनेट बैठकीला गैरहजर, पण 564 कोटींसाठी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार

मुंबई : राज्यात बीड जिल्हा आणि परळी तालुका गेल्या 2 महिन्यांपासून चर्चेत असून सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणामुळे जिल्ह्यातील वातावरण चिघळल्याचं दिसून आलं. त्यातच, बीडमधील गुन्हेगारीचा म्होरक्या म्हणत वाल्मिक कराडवर गंभीर आरोप देखील जिल्ह्यातील लोकप्रतिनीधींकडून झाले असून वाल्मिक कराड मंत्री धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय असल्याने धनंजय मुंडेंच्या (Dhananjay munde) राजीनाम्याची मागणी देखील होत आहे. मात्र, अद्यापही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख अजित पवार किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंडेंच्या राजीनाम्याबाबत कुठलाही ठोस निर्णय घेतला नाही. त्यातच, आधी मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि नंतर बेल्स पाल्सी आजाराने ग्रस्त असल्याने धनंजय मुंडे मंत्रिमंडळ बैठका आणि पक्षाच्या कामकाजापासून दूर असल्याचे दिसून येते. त्यातच, आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीला देखील त्यांची अनुपस्थिती होती. सगल तिसऱ्या मंत्रिमंडळ बैठकीला ते प्रकृतीच्या कारणास्तव अनुपस्थित राहिले. मात्र, आजच्या बैठकीत परळीतील (Parli) पशुवैद्यकीय महाविद्यालयासंदर्भाने झालेल्या निर्णयावर त्यांनी मुख्यमंत्र्‍यांचे आभार मानले आहे.

बीड जिल्ह्यातील परळी येथे नवीन पशुवैद्यक पदवी महाविद्यालय स्थापन करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. राज्य सरकारच्या कॅबिनेट बैठकीत यासंदर्भातील निर्णय झाला. या महाविद्यालयासाठी 564.58 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. त्यामुळे, बीड जिल्हा व परळी तालुक्यातील नागरिकांसाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय ठरणार आहे. त्यामुळेच, बीडचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांनी ट्विट करुन या निर्णयासंदर्भात मुख्यमंत्र्‍यांचे आभार मानले आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या  बैठकीत आमच्या परळी विधानसभा मतदारसंघातील  परळी वैद्यनाथ येथे नवीन पशुवैद्यक पदवी महाविद्यालय स्थापन करण्यास मंजुरी देण्यात आली असून यासाठी 564.58 कोटी रुपये निधीची तरतूद करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय अजित दादा पवार, उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब तसेच पशू संवर्धन मंत्री आणि माझ्या भगिनी पंकजाताई मुंडे यांचे मनःपूर्वक आभार, असे ट्विट धनंजय मुंडेंनी केले आहे.

परळी मतदारसंघात कृषी महाविद्यालय, कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय, सोयाबीन संशोधन व प्रक्रिया केंद्र, सीताफळ इस्टेट या शासकीय शिक्षण-प्रशिक्षण संस्था अलीकडच्या काळात मंजूर करण्यात आलेल्या आहेत. त्यापाठोपाठ पशुवैद्यक पदवी महाविद्यालय मंजूर झाल्याने हे प्रगतीच्या वाटेवर आणखी एक विश्वासात्मक पाऊल ठरणार आहे, असेही मुंडेंनी ट्वटिरवरुन म्हटलं आहे. दरम्यान, धनंजय मुंडेंना बेल्स पाल्सी नावाचा आजार झाल्याने त सध्या आराम करत आहेत. त्यामुळेच, मंत्रिमंडळ बैठका आणि पक्षाच्या जनता दरबाराला त्यांची अनुपस्थिति दिसून येते. आजही मंत्रालयात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीला त्यांची अनुपस्थिति दिसून आली.

हेही वाचा

10 वीच्या पहिल्याच पेपरला कॉपी, 2 शिक्षकांसह मुख्याध्यापिका अडकल्या; व्हायरल व्हिडिओनंतर गुन्हा दाखल

अधिक पाहा..

Comments are closed.