पुण्यात तरुणीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाचा फोटो समोर, पोलिसांच्या डॉग स्क्वाडचा शेतात तपास

पुणे: पुण्यातील स्वारगेट एसटी बस आगारात एका तरुणीवर बलात्कार (Pune Rape news) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. बलात्काराचा आरोप असलेला दत्तात्रय गाडे (Dattatray Gade) हा आरोपी फरार आहे. पोलिसांनी त्याच्या भावाकडे त्याची चौकशी सुरु केली आहे. दत्तात्रय गाडे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर पुण्यातील शिरुर  पोलीस स्थानकात या आधी चोरी आणि चेन स्नॅचींग यासारख्या गुन्ह्यांची नोंद आहे. (Pune Crime News)

पीडित तरुणीने या घटनेची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपासाला सुरुवात केली आहे. आरोपी दत्तात्रय गाडेला शोधण्यासाठी पोलिसांनी आठ पथकं तयार केली आहेत. या पथकांकडून दत्तात्रय गाडेचा कसून शोध घेतला जात आहे. दत्तात्रय गाडे हा पुण्याच्या आजुबाजूच्या परिसरातील शेतात लपण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांकडून शेतात डॉग स्क्वाडच्या माध्यमातून तपासणी केली जात आहे. पोलिसांनी दत्तात्रय गाडे याच्या भावाला गाठले असून त्याच्याकडून माहिती घेतली जात आहे.

मंगळवारी (25 फेब्रुवारी) पहाटे साडेपाच वाजता ही घटना घडली. स्वारगेट डेपोतील सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. यामध्ये पीडित आणि आरोपी दोघंही स्पष्टपणे दिसत नाहीत. बस ज्या ठिकाणी उभी आहे, त्याठिकाणी अंधार  आहे. आजूबाजूला अनेक बस असल्याचे देखील दिसत आहे. स्वारगेट बस आगाराच्या मधोमध ही बस उभी असल्याचं सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे. या शिवशाही बसवर सोलापूर-स्वारगेट अशी पाटी लिहिलेली आहे. पोलिसांकडून सध्या या शिवशाही बसची तपासणी सुरु आहे. या बसमध्ये पोलिसांना काही पुरावे मिळतात का, हे बघावे लागेल. तसेच पीडित तरुणीच्या वैद्यकीय तपासणी अहवालातून कोणती माहिती समोर येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

स्वारगेट एसटी आगारात नेमकं काय घडलं?

ही तरुणी ज्याठिकाणी बसली होती, तिच्या शेजारी आणखी एक व्यक्ती होती. आरोपी तरुणीशी बोलायला आल्यानंतर हा व्यक्ती निघून गेला. त्यानंतर आरोपी दत्तात्रय गाडे याने तरुणीशी गोड बोलून ओळख काढली. कुठे जाते ताई? असे त्याने तरुणीला विचारले. त्यावर तरुणीने आपल्याला फलटणला जायचे असल्याचे सांगितले. त्यावर दत्तात्रय गाडे म्हणाला की, सातारची बस तिकडे लागली आहे. त्यावर तरुणी म्हणाल की, सातारची बस इकडेच लागते म्हणून मी इथे बसलेय. पण आरोपीने तरुणीला बस दुसरीकडे लागली आहे, मी तुला तिकडे घेऊन जातो, असे सांगितले. तेव्हा ही तरुणी आरोपीच्या पाठीमागे चालत गेल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

ही मुलगी बसजवळ पोहोचली तेव्हा अंधार होता. त्यामुळे तिला बसमध्ये चढायचे की नाही, हा प्रश्न पडला. त्यावर आरोपीने म्हटले की, रात्रीची बस आहे, लोक झोपल्यामुळे दिवे बंद आहेत. तू वर चढून टॉर्चने चेक कर. त्यानंतर ही तरुणी बसच्या आतमध्ये गेली तेव्हा आरोपीने पटकन आतमध्ये जाऊन बसचा दरवाजा लावून घेतला. यानंतर आरोपीने तरुणीवर अतिप्रसंग केला. अत्याचार झाल्यानंतर आरोपी बसमधून उतरून निघून गेला. त्यानंतर मुलगीही बसमधून खाली उतरली. ती दुसऱ्या बसमध्ये बसून आपल्या गावी जात होती, तेव्हा तिने एका मित्राला फोन लावला आणि घडलेला प्रसंग सांगितला. मित्राने सांगितल्यावर ही तरुणी पोलीस ठाण्यात आली आणि पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला.

https://www.youtube.com/watch?v=tjv2zlglowa

आणखी वाचा

सकाळी फलटणसाठी निघाली, बसस्थानकाच्या बाकड्यांवर बसली; 26 वर्षीय तरुणीवर पुण्यात अत्याचार, पीडित अन् आरोपीमध्ये संवाद काय झाला?

अधिक पाहा..

Comments are closed.