शॉकिंग! मठाचा पुजारी अन् मालक मीच म्हणत 64 वर्षीय शिवाचार्य स्वामींना लोखंडी गजाने जबर मारहाण
सोलापूर : बीडमधील संतोष देशमुख हत्याप्रकरणानंतर राज्यातील अनेक जिल्ह्यातून राजकीय वरदहस्त असलेल्या गुंडांकडून जबर मारहाण केल्याचे व्हिडिओ (Video) व्हायरल झाले आहेत. त्यामध्ये, जालना, बीडमधील शिरुर कासार येथील काही व्हिडिओ व्हायरल झाल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. त्यातच, चक्क 64 वर्षीय शिवाचार्य स्वामीजींना लोखंडी गजाने जबर मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. “या मठाचा मीच पुजारी व मालक असून तू बाहेरुन आलेला आहे, तुझा येथे काहीही एक संबंध नाही “असे म्हणून धर्मोपदेशक राचोटेश्वर शिवाचार्य स्वामीजी (वय 64 रा.सिध्दनकेरी) यांना लोखंडी गजाने पाठीवर, उजव्या खांद्यावर, दोन्ही मांड्यावर नडगीवर मारुन गंभीर जखमी करण्यात आले. याप्रकरणी, राजू लिंगाप्पा कोरे, मंजूनाथ सकलेश कोरे, भिमू सिध्दाप्पा कोरे, प्रमोद रेवाप्पा कोरे, संतोष रामचंद्र कोरे, सिध्दू येसाप्पा कोरे या 6 जणाविरुध्द मंगळवेढा पोलिसात (Police) गुन्हा दाखल झाला आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी,यातील फिर्यादी राचोटेश्वर स्वामीजी हे पंढरपूरमधील सिध्देनकेरी येथील तोफकट्टी संस्थान मठात गेली 36 वर्षापासून रहावयास आहेत. यातील फिर्यादी हे तोफकट्टी संस्थानमध्ये मठपती म्हणून धर्मोपदेशनाचे काम करीत आहेत. या मठातच श्री सिध्देश्वर मंदिरही आहे. फिर्यादीच्या सोबत सेवेत त्यांची शिष्य काशिबाई रेवणसिध्द स्वामी व शिवमुर्ती राचप्पा स्वामी हे नेहमी असतात. सिध्दनकेरी गावातील काही लोक पूजापाठ करण्याकरीता तो मठ आमचा आहे, असे म्हणून फिर्यादीसोबत सातत्याने वाद घालत असतात.
दरम्यान, 3 मार्च रोजी रात्री 9 वाजता मठामध्ये खोलीत फिर्यादी झोपण्याकरिता जात असताना वरील आरोपींनी मठामधील सीसीटीव्हीची तोडफोड केली. तसेच, या मठाचा मीच पुजारी व मालक आहे, तू बाहेरुन आलेला असून तुझा येथे काहीही संबंध नाही. तू बाहेर ये असे म्हणून आरोपींनी स्वामीजींना खोलीतून बाहेर ओढत आणले, त्यावेळी फिर्यादीने आरोपीस आपले प्रकरण कोर्टामध्ये चालू आहे तुम्ही असे करु नका असे समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरीही त्यांनी न ऐकता मठातील लाईट बंद करुन फिर्यादीस लोखंडी गजाने पाठीवर, उजव्या खांद्यावर, दोन्ही मांड्यावर, नडगीवर जबर मारहाण करुन गंभीर जखमी केले. याप्रकरणी, 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.
हेही वाचा
अधिक पाहा..
Comments are closed.