आयटी स्टॉक्सची धूळदाण, पाचव्या दिवशी शेअर गडगडले, गुंतवणूकदारांचे 8.4 लाख कोटी स्वाहा

मुंबई : भारतातील आयटी कंपन्यांच्या स्टॉक्समध्ये सलग पाचव्या दिवशी घसरण पाहायला मिळाली. निफ्टी आयटी निर्देशांक 0.50 टक्क्यांनी घसरुन 36065.80  अकांपर्यंत पोहोचला होता. निर्देशांकातील सर्व 10 कंपन्यांचे शेअर गडगडले आहेत. इन्फोसिस, विप्रो, परसिस्टंट कंपन्यांच्या शेअर देखील घसरले आहेत. निफ्टी आयटी निर्देशांक त्यांच्या उच्चांकावरुन 21 टक्क्यांनी घटला आहे. त्यामुळं निफ्टी आयटी इंडेक्स बेअर मार्केट झोनमध्ये पोहोचला आहे. निफ्टी आयटीमधील घसरणीमुळं गुंतवणूकदारांचे 8.4 लाख कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे.

निफ्टी आयटी निर्देशांकातील 10 पैकी 9 कंपन्यांचे शेअर्स बेअर मार्केट झोनमध्ये गेले आहेत. सर्वाधिक नुकसान एलटीआय-माईंडट्री च्या शेअरचं झालं आहे. या शेअरमध्ये 34 टक्के घसरण झाली आहे. इन्फोसि आणि टीसीएस सारख्या कंपन्यांचे शेअर 24 टक्क्यांनी घसरले आहेत.

निफ्टी आयटी निर्देशांकातील विप्रो या कंपनीच्या शेअरमध्ये 17 टक्क्यांनी घसरला आहे. हा शेअर इतर शेअरच्या तुलनेत अपवाद ठरला आहे. जर एखाद्या शेअरमध्ये 20  टक्क्यांपेक्षा अधिक घसरण झाल्यास तो शेअर बेअर मार्केट झोन समजला जातो.

टीसीएसच्या शेअरमध्ये घसरण झाल्यानं त्याचं बाजारमूल्य 3.8 लाख कोटींनी घटलं आहे. दुसरीकडे इन्फोसिसच्या शेअरमध्ये घसरण झाल्यानं त्यांचं बाजारमूल्य 1.7 लाख कोटींनी घटलं आहे.  एलटीटीएस आणि कोफोर्जच्या मार्केट वॅल्यूमध्ये सर्वात कमी घट झाली आहे. अनुक्रमे या दोन्ही कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये 15000 कोटी आणि 16000 कोटी रुपयांची घसरण झाली आहे.

बाजारतज्ज्ञांच्या मते अमेरिकेतील अर्थव्यवस्थेत मंदी असण्याची शक्यता असल्यानं आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाच्या टॅरिफ धोरणांमुळं अनिश्चितता निर्माण झाली आहे. यामुळं भारतीय आयटी कंपन्यांवर दबाव वाढला आहे. कारण या कंपन्यांसाठी अमेरिका सर्वात मोठी बाजारपेठ आहे. तिथून या कंपन्यांना 60 ते 70 टक्के उत्पन्न मिळतं.

अनालिस्टच्या मते, अमेरिकेतील कंपन्या त्यांच्या आयटी बजेटमध्ये कपात करण्याची शक्यता आहे. यामुळं  भारतीय आयटी कंपन्याच्या उत्पन्नावर परिणाम होऊ शकतो.जियोजित फायनान्शिअल सर्व्हिसेसच्या चीफ इन्वेस्टमेंट स्ट्रॅटेजिस्ट वीके विजयकुमार यांच्या मतानुसार अमेरिकेतील मंदीची शक्यता आणि टॅरिफ वॉरमुळं जागतिक बाजारावर परिणाम झाला आहे. गेल्या महिन्यात नॅस्डॅक 100  निर्देशांकात 10 टक्क्यांहून अधिक घसरण झाली. ज्याचा परिणाम भारतीय आयटी कंपन्यांवर देखील झाला आहे.

इतर बातम्या :

RBI Repo Rate Cut: आरबीआय आणखी एक गुड न्यूज देणार, एप्रिलमध्ये रेपो रेटमध्ये कपातीची शक्यता, कर्जदारांना दिलासा

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

अधिक पाहा..

Comments are closed.