सामाजिक तेढ वाढवणाऱ्या नितेश राणेंचा बोलविता धनी कोण? नागपूरच्या दंगलीनंतर भास्कर जाधवांचा सवाल

नागपूर: नागपूर शहरामध्ये काल (सोमवार, 17 मार्च) दोन गटांत संघर्ष झाल्यामुळे महालमधील झेंडा चौकात तणाव निर्माण झाला होता. एका गटातील युवकांनी पोलिसांवर आणि घरांवर दगडफेक केली. प्रत्युत्तरात पोलिसांनीही त्या गटावर अश्रूधुरांच्या नळकांड्या फोडून जमाव पांगवला. ही घटना काल (सोमवार, 17 मार्च ) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली. याचा परिणाम शहरातील दिसून येत आहे. शहराच्या अनेक भागात संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. शहरातील शाळांना, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली. शहरात आज तणावपूर्ण शांतता दिसून येत आहे. शहरातील महाल भागासह इतर परिसरात संतप्त जमावाने केलेल्या समाजविघातकी कृत्यामुळे मोठी वित्तहानी झाली आहे. तर दगडफेक आणि जाळपोळीच्या घटनेमुळे अनेकांचे मोठे आर्थिक नुकसान झालं आहे. यात कित्येक निष्पाप नागरिकांच्या घरासमोर उभी असलेली वाहने अज्ञातांनी आग लावून पेटवून दिली आहेत. या सर्व घटनेवरती शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी संताप व्यक्त केला आहे, त्याचबरोबर नितेश राणे यांच्यावर देखील टीका केली आहे.

काय म्हणालेत भास्कर जाधव?

भास्कर जाधव यांनी या प्रकरणी प्रतिक्रिया देताना म्हटलं की, नागपूरमध्ये जी दंगल झाली, त्याचा मी निषेध करतो. अशांततेचं वातावरण तयार करण्याचं युतीच्या काही जबाबदार नेत्यांकडून मंत्र्यांकडून वक्तव्ये केली जातात. या वक्तव्यातून महाराष्ट्रात अशांतता निर्माण व्हावी अशी भूमिका दिसतेय. हे सगळं सरकार निर्मित होतंय का? सरकार करतंय का? अशी शंका घेण्यास वाव आहे. औरंजेबाची कबर बांधून 400 वर्षे झाली. सातत्याने या कबरीचा विषय काढून उदोउदो करण्याचं काम सत्ताधाऱ्यांकडून होतंय. दोन समाजात तेढ निर्माण करण्याचं काम सत्ताधाऱ्यांकडून होत आहे. नितेश राणेंबाबत बोलताना भास्कर जाधव म्हणाले, कोण नितेश राणे, त्यांना कशाकरिता मोठं करायचं. नितेश राणे वक्तव्य करेल आणि एवढं होईल असं नाहीये, नितेश राणे यांना बोलवता धनी कोण आहे? असा सवालही भास्कर जाधव यांनी उपस्थित केला आहे.

त्याच्यामागे एक व्यक्ती नसून एक संघटना आहे. औरंगजेबाच्या कबरीवरच इतर काम काढलं, मग कबर का नाही काढलं?अयोध्याच्या राम मंदिराचा प्रयोग आता कमी झालेला दिसतोय. त्यामुळे आता औरंगजेबाच्या नामाचा जप केला जातोय. एक व्यक्ती हे सगळं करू शकत नाही, त्यामागे एक संघटना आहे, ती सगळं बोलायला लावते, असं भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे.

काय आहे घटनाक्रम?

– काल 1 वाजता : विश्व हिंदू परिषदेच्या जवळपास ३० ते ३५ कार्यकर्त्यांनी काल दुपारी बारा  वाजता महालच्या शिवाजी चौकात आंदोलनाला एकत्र आले

– काल 1:30 वाजता – आंदोलनादरम्यान चौकात औरंगजेबाचे छायाचित्र आणि प्रतिकात्मक कबर तयार केली.औरंगजेबाच्या छायाचित्राला चपलेने मारून निषेध व्यक्त केला. औरंगजेबाच्या प्रतिकात्मक कबरेला पेटविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या कबरेवर एका धर्मासाठी पवित्र मानण्यात येणारी हिरवी चादर टाकण्यात आली होती. त्यावर कुराणाच्या आयात लिहिलेल्या होत्या. ती चादर पेटवल्याची चर्चा सर्वत्र पसरली.

– दुपारी 3 वाजता : दुसऱ्या गटाने त्यावर आक्षेप घेत विरोध नोंदविला

– दुपारी 3:30 वाजता पोलिसांनी परिस्थिती शांत केली

– दुपारी 4 वाजता :  विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते महाल चौकात एकत्र यायला सुरवात झाली

– सायंकाळी 5 वाजता : औरंगजेबाची प्रतिकात्मक कबरेवरील हिरव्या रंगाची चादर जाळल्याचे काही छायाचित्र समाजमाध्यमांवर वायरल झाले.

– रात्री 7 वाजता : विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांकडून व मुस्लिम गटाकडून  छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर एकमेकांच्या विरोधात नारेबाजी सुरु झाली

– सायंकाळी 7 वाजता पोलीसांनी अधिकची कुमक मागवून घेतली

– रात्री साडेसात वाजता पोलिसांनी दोन्ही गटाला आंदोलन बंद करण्यास भाग पाडले.

– रात्री आठ वाजता चिटणीस पार्क चौकाकडून एक गट आला. त्यांनी हिरव्या चादरीबाबत आक्षेप घेतला. त्यानंतर पोलिसांनी संपूर्ण परिसराला घेराव करीत पोलिसांचा मोठा ताफा तैनात केला.

– रात्री साडेआठ वाजता दोन्ही धार्मिक गटांनी एकमेकांच्या विरोधात नारेबाजी केली. त्यामुळे वाद चिघळला. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून दुकाने बंद करण्यास भाग पाडले.

– दुकाने बंद केल्यामुळे एकच गोंधळ उडाला. पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. पोलिसांनी जमावावर अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या गेल्या.

– दोन्ही गटातील युवकांनी दगडफेक करणे सुरु केले. काहींनी जाळपोळ केली.

– रात्री ८.४० पासून वाजतापासून दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण झाली

– रात्री – 9 वाजता एका गटाकडून भालदारपुरा व चिटणवीस पार्क परिसरात भागात जेसीबी व वाहनांची जाळपोळ सुरु झाली. काही स्थानिकांच्या घरांवर हल्ले झाले

– दंगलखोरांना पांगवण्यासाठी पोलीस देखील रस्त्यावर उतरली

– रात्री 10:30 नंतर पोलीसांनी दंगलखोरांनी धरपकड सुरु केली

– रात्री 12 वाजता हंसापुरी व गीतांजली थेटर परिसरात काही वाहनांची तोडफोड करत स्थानिकांच्या  घरांवर हल्ले करण्यात आले

– रात्रभर पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन सुरु करत 46 आरोपींना ताब्यात घेत गणेशपेठ पोलिसठाण्यात आण्यात आले.

– प्रभावित भागात संचारबंदी लागू करण्यात आली

https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq

Comments are closed.