गोपीचंद पडळकरांनी औंध देवस्थानाची 34 एकर जमीन लाटली; कागदपत्रे दाखवत राम खाडेंचा गंभीर आरोप

मुंबई : राज्यातील मंत्री व आमदारांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले जात असून गेल्या काही दिवसांपूर्वी माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. तर, मंत्री जयकुमार रावल यांच्यावरही माजी राष्ट्रपतींची जमीन हडपल्याचा आरोप अनिल गोटे यांनी केला होता. राज्यातील नेतेमंडळींवर होत असलेल्या आरोपांवरुन विरोधकही आक्रमक होताना दिसत आहेत. त्यातच, आता भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी 34 एकर जमीन (जमीन) लाटल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. औंध देवस्थानाची तब्बल 34 एकर जमीन बेकायदेशीररित्या हडप केल्याचा आरोप गोपीचंद पडळकर (Gopichand padalkar) यांच्यावर सामाजिक कार्यकर्ते राम खाडे यांनी केला आहे. विशेष म्हणजे हे आरोप करताना तत्कालीन मंत्री चंद्रकांत पाटील आणि आमदार सुरेश धस यांनीही या प्रकरणात पडळकर यांना मदत केल्याचा दावा खाडे यांनी केला आहे. त्यामुळे, आता आमदार पडळकर आणि सरकार यावर काय उत्तर देते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

राम खाडे यांच्या म्हणण्यानुसार, चंद्रकांत पाटील, सुरेश धस आणि प्रकाश सोळंके यांच्या मंत्रिपदाच्या कार्यकाळात ही जमीन खालसा करण्याचा व्यवहार पार पडला आहे. त्यामुळे केवळ पडळकरच नव्हे, तर संबंधित माजी मंत्र्यांचीही चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी खाडे यांनी केली आहे. खाडे यांनी औंध संस्थानमधील या जमिनीच्या व्यवहाराची कागदपत्रे देखील माध्यमांना दाखवली आहे. त्यामुळे, आता याप्रकरणी गोपीचंद पडळकरांची भूमिका काय हे पाहणे महत्त्वाचे आहे. दरम्यान, “हा थेट धार्मिक संस्थेच्या जमिनीवर डल्ला मारण्याचा प्रकार आहे. त्यामुळे गोपीचंद पडळकर यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करावा, तसेच या प्रकरणात मदत करणाऱ्या चंद्रकांत पाटील यांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा,” अशी मागणी राम खाडे यांनी केली आहे. सध्या विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असतानाच हे प्रकरण समोर आले आहे.

पडळकरांनी मांडली भूमिका

धर्मादाय आयुक्तांकडे नोंद नसलेल्या जमिनी या राज्य सरकारची रीतसर परवानगी घेऊन त्याचा कर भरणा करुन वर्ग तीन ची जमीन वर्ग एक करून ती विक्री करता येते. हे प्रकरण जुने असून रीतसर परवानगी घेऊनच हा सगळा व्यवहार झाला आहे, असे स्पष्टीकरण गोपीचंद पडळकर यांनी यासंदर्भात बोलताना दिले.

हेही वाचा

नागपूरचे CP ऑन द स्पॉट, घटनास्थळाची पाहणी; फहीम खानच्या रोलबाबत रवींद्रकुमार सिंगल यांनी दिली माहिती?

अधिक पाहा..

Comments are closed.