संजय गायकवाडांनंतर रोहित पवारांचा पोलिसांवर गंभीर आरोप, सीएम फडणवीसांचं नाव घेत म्हणाले, नेरुळ

रोहित पवार: शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी “महाराष्ट्र पोलिसांसारखा (Police) अकार्यक्षम विभाग जगात कुठेही नाही. पोलिसांनी 50 लाख रुपये पकडले तरी ते फक्त 50 हजार रुपये दाखवतात.”, असे वक्तव्य केले होते. संजय गायकवाड यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. अनेक राजकीय नेत्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी यावरून गंभीर आरोप केलाय.

नेमकं काय म्हणाले रोहित पवार?

रोहित पवार म्हणाले की, आमदार संजय गायकवाड जे म्हणाले ते खोटं आहे, असं अजिबात नाही. ते म्हणाले की 50 लाखांचा पोलिसांना माल सापडला तर ते दाखवताना कमी दाखवतात आणि वरचे पैसे घेतात. त्यांना माहिती आल्याशिवाय ते बोलणार नाही. माझी मागणी आहे की, गायकवाड आरोप करत असलेले पोलीस अधिकारी शोधून काढा. देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे की, नेरुळमध्ये ड्रग्ज प्रकरणात एफआयर झाली आहे. त्याबाबत बोला. कारण या प्रकरणात पोलीस प्रशासनातील लोकं सहभागी आहेत. 1100 ते 1200 कोटी रुपयांचा तो व्यवहार आहे. प्रत्यक्षात रक्कम वेगळी दाखवली आहे. पोलीस प्रशासन यामध्ये सहभागी आहेत, असा आरोप त्यांनी केला आहे.

संजय गायकवाड वक्तव्यावर ठाम

दरम्यान, आमदार संजय गायकवाड यांनी पोलिसांबद्दल केलेल्या वक्तव्यावर ते ठाम आहेत. मी पोलिसांची दिलगिरी व्यक्त केली. मात्र, माझ्या व्यक्तिगत अनुभवावरून वक्तव्य केलं असून मी माझ्या वक्तव्यावर ठाम आहे, असे त्यांनी म्हटले. तसेच, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना फोन करून या विषयावर चर्चा केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती देखील एकनाथ शिंदे यांनी दिल्याचे संजय गायकवाड यांनी म्हटले आहे.

लाडक्या बहि‍णींचा केवळ मतांसाठी वापर : रोहित पवार

विधानसभा निवडणुकीदरम्यान महायुतीचे सरकार आल्यास लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचे आश्वासन सरकारने दिले होते. त्यामुळे लाडक्या बहिणी 2100 रुपयांसाठी प्रतीक्षेत असतानाच, राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवाळ यांनी “लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचे कुणीही सांगितले नाही,” असे वक्तव्य करत या मुद्द्यावर घूमजाव केला आहे. याबाबत विचारले असता रोहित पवार म्हणाले की, भाषणात अनेक नेते बोलले होते की पैसे वाढवून देऊ. आता महिला म्हणत आहेत की, निवडणुका ज्यावेळी होत्या त्यावेळी 2 महिने आधी पैसे दिले. आता, मात्र आमच्या हक्काचे पैसे दिले नाही. म्हणजेच यांनी केवळ मतांसाठी आमचा वापर केला, असे म्हणत त्यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला.

https://www.youtube.com/watch?v=38xd7o9uh38

आणखी वाचा

India Banned 16 Pakistani YouTube channels : डॉन न्यूज, समा टीव्ही, जिओ न्यूज ते शोएब अख्तर सुद्धा! केंद्र सरकारकडून 16 पाकिस्तानी वृत्तवाहिन्यांच्या युट्यूब चॅनेलवर बंदी

अधिक पाहा..

Comments are closed.