मटण पार्टी विथ पोलीस प्रकरणी गजा मारणेला ढाब्यावर नेणारा सांगलीचा पांड्या जेरबंद, तर मारणेची पु
पुणे: सुरक्षेच्या कारणास्तव गुंड गजा मारणे याची येरवडा कारागृहातून सांगली कारागृहामध्ये रवानगी करत असताना मारणे याने ढाब्यावर मटण पार्टी केल्याचे सीसीटीव्हीतून समोर आले होते. या घटनेची गंभीर दखल घेत पुणे पोलिस आयुक्तांनी बंदोबस्तावरील सहायक पोलिस निरीक्षकासह पाच पोलिसांवर निलंबनाची कारवाई केली. त्याचबरोबर, गजा मारणेला घेऊन जात असताना पोलिस ताफ्याचा पाठलाग करत मारणेला ढाब्यावर भेटणाऱ्या सराईतासह तिघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गजा मारणेसोबतच्या मटण पार्टीनंतर गुन्हे शाखेतील सहायक पोलिस निरीक्षक सुरजकुमार यलप्पा राजगुरू, हवालदार महेश लक्ष्मण बामगुडे, हवालदार सचिन लक्ष्मण मेमाणे, रमेश ताऊजी मेमाणे व शिपाई राहुल मनोहर परदेशी अशी कारवाई करण्यात आलेल्यांची नावे आहेत. गजा मारणे याला सांगली येथील कारागृहात घेऊन जात असताना पोलिस बंदोबस्तावर सहायक पोलिस निरीक्षकासह चार पोलिस कर्मचारी होते. मारणेला सांगली कारागृहात नेत असल्याची माहिती त्याच्या साथीदारांना मिळाली. मारणेच्या व्हॅनच्या मागावर साथीदारांच्या कारचा ताफा होता. पुणे-सातारा महामार्गावरील एका ढाब्यावर व्हॅन थांबवण्यात आली. बंदोबस्तात असलेल्या सहायक पोलिस निरीक्षकासह पाच पोलिस कर्मचाऱ्यांनी ढाब्यावर जेवण केलं. त्याठिकाणी मारणेला मोटारीतून आलेल्या सतीश शिळीमकर, विशाल धुमाळ, बाळकृष्ण उर्फ पांड्या मोहिते यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी मारणेला बिर्याणी नेऊन दिली. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांत कैद झाला होता. मारणेच्या मटण पार्टीची माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांना मिळाली. त्यानंतर याप्रकरणाची गंभीर दखल घेऊन चौकशी केली.
सांगली कारागृहातून पुन्हा येरवडा कारागृहात रवानगी
गजा मारणेच्या विरोधात गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. कोथरुड भागात संगणक अभियंत्याला मारहाण केल्याप्रकरणी मारणेसह साथीदारांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई करण्यात आली आहे. यापूर्वी मारणेला अटक करण्यात आली होती. गंभीर गुन्ह्यात अटक केल्यानंतर गजा मारणे राज्यातील अन्य कारागृहात राहण्यास पसंती देतो, ही बाब पोलिस आयुक्तांना समजली होती. त्यामुळे मारणेला सांगली कारागृहातून पुन्हा येरवडा कारागृहात हलवण्यात आल्याची माहिती आहे.
गजा मारणेला ढाब्यावर नेणारा सांगलीचा पांड्या कोठडीत
गजा मारणेला येरवडा कारागृहातून सांगली कारागृहात नेत असताना वाटेत ढाब्यावर मटण बिर्याणी खाऊ घालणाऱ्या बाळकृष्ण उर्फ पांड्या लक्ष्मण मोहिते याला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने काल (बुधवारी) अटक केली आहे. न्यायालयीन कोठडीत असलेल्या मारणेला बाळकृष्ण उर्फ पांड्या लक्ष्मण मोहिते याने पैसे, कपडे, बकेट व इतर वस्तू देऊन मदत केल्याचं पोलिस तपासात निष्पन्न झालं आहे. विशेष न्यायालयाने पांड्याला पाच दिवसांची ‘मकोका’ कोठडी सुनावली आहे.
कोथरूड येथील आयटी कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी गजानन मारणे याच्यासह रुपेश मारणे, ओम धर्मजिज्ञासू, किरण पडवळ, अमोल तापकीर (सर्व रा. शास्त्रीनगर, कोथरूड) आणि बाब्या उर्फ श्रीकांत पवार (रा. वडगाव रासाई, शिरूर) या सहा जणांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायद्यानुसार (मकोका) कारवाई करण्यात आली होती. याच गुन्ह्यात पांड्याला अटक करण्यात आली असून, त्याच्यासोबतच त्या ढाब्यावरील मटण पार्टीवेळी गजा मारणेची भेट घेणारे प्रदीप कंधारे, सतीश उर्फ आबा सुधाकर शिळीमकर व विशाल विलास धुमाळ यांच्यावरही या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, रुपेश मारणे व बाब्या पवार यांचा पोलिस तपास करत आहेत.
https://www.youtube.com/watch?v=qm25ybspbrm
अधिक पाहा..
Comments are closed.