दक्षिण कोरियासोबत एक प्रमुख तंत्रज्ञान करार

चिप्सपासून जहाजबांधणीपर्यंत विविध क्षेत्रांतील द्विपक्षीय भागीदारी बळकट : डिजिटल पेमेंट करारावर स्वाक्षरी

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भारत आणि दक्षिण कोरिया आता चिप्सपासून जहाजबांधणीपर्यंत सर्वच क्षेत्रांमध्ये भागीदार होतील. सोमवारी पंतप्रधान मोदी आणि दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली जे-म्युंग यांच्यात झालेल्या द्विपक्षीय चर्चेनंतर हा करार झाला. यासोबतच, दोन्ही देशांमध्ये एका मोठ्या इलेक्ट्रॉनिक पेमेंट करारावर स्वाक्षरी करण्यात आली आहे. याअंतर्गत, दोन्ही देशांचे नागरिक आता भारत आणि दक्षिण कोरिया दरम्यान प्रवास करताना क्यूआर कोड वापरून सहजपणे पेमेंट करू शकतील. महत्त्वाचे करार करण्यासोबतच 2028 मध्ये भारत-द.कोरिया मैत्री महोत्सवाचे आयोजन करण्यावरही दोन्ही देशांचे एकमत झाले आहे. दोन्ही देशांमध्ये अनेक महत्त्वाच्या सामंजस्य करारांची (एमओयू) देवाण-घेवाण झाली.

दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली जे-म्युंग सध्या तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत. त्यांच्या या भेटीदरम्यान द्विपक्षीय करारांना मूर्त स्वरुप देण्यात आले आहे. द्विपक्षीय चर्चेत व्यापार, गुंतवणूक, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), सेमीकंडक्टर, महत्त्वपूर्ण आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान आणि लोकांमधील संपर्क वाढवणे यांसारख्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करण्यात आले. भारत आणि दक्षिण कोरियाने इलेक्ट्रॉनिक पेमेंट प्रणाली जोडण्याबाबत सामंजस्य करारावर (एमओयू) स्वाक्षरी केली आहे. या सुविधेमुळे दोन्ही देशांचे नागरिक एकमेकांच्या देशांना भेट देताना स्थानिक क्यूआर कोड प्रणाली वापरून पेमेंट करू शकतील. या पावलामुळे परस्पर प्रवास आणखी सोयीस्कर होईल, असे ली जे-म्युंग यांनी स्पष्ट केले.

2010 मध्ये सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करार (सेपा) लागू झाल्यानंतर दोन्ही देशांमधील द्विपक्षीय व्यापार आणि आर्थिक संबंधांना नवी गती मिळाल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. आता चिप्सपासून जहाजांपर्यंत, प्रतिभेपासून तंत्रज्ञानापर्यंत, मनोरंजनापासून ऊर्जेपर्यंत विविध क्षेत्रांमध्ये आम्ही सहकार्याच्या नवीन संधी शोधणार आहोत, यावर पंतप्रधान मोदींनी जोर दिला. दोन्ही देश सर्वसमावेशक इंडो-पॅसिफिकच्या दिशेने काम करत राहतील. आमच्या संयुक्त प्रयत्नांतून, आम्ही शांततापूर्ण, प्रगतीशील आणि सर्वसमावेशक इंडो-पॅसिफिक क्षेत्राच्या निर्मितीसाठी योगदान देत राहू, असेही ते पुढे म्हणाले.

50 अब्ज डॉलर्सपर्यंत व्यापाराचे उद्दिष्ट

भारत आणि दक्षिण कोरिया यांच्यातील द्विपक्षीय व्यापार 27 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचला आहे. आता 2030 पर्यंत 50 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचण्याचे लक्ष्य निर्धारित करण्यात आल्याचे बैठकीनंतर पंतप्रधान मोदींनी सांगितले. आठ वर्षांनंतर कोरियन राष्ट्राध्यक्षांचा भारत दौरा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. लोकशाही मूल्ये, बाजार अर्थव्यवस्था आणि कायद्याच्या राज्याप्रती आदर हे दोन्ही देशांच्या स्वभावातच रुजलेले आहे. इंडो-पॅसिफिक क्षेत्रातही आमची समान उद्दिष्ट्यो आहेत. याच्या आधारावर, गेल्या दशकात आमचे संबंध अधिक दृढ झाले आहेत. त्यांच्या भेटीमुळे या विश्वासपूर्ण भागीदारीचे भविष्यातील भागीदारीत रुपांतर होईल. तसेच चिप्सपासून ते तंत्रज्ञान, पर्यावरण आणि ऊर्जा अशा विविध क्षेत्रांमध्ये नवीन संधी निर्माण होतील, असेही त्यांनी स्पष्ट पेले.

शांतता आणि स्थिरतेचा संदेश

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली जे-म्युंग यांनी भारत-कोरिया व्यावसायिक नेते संवादात भाग घेतला. याप्रसंगी त्यांनी द्विपक्षीय सहकार्य अधिक दृढ करण्यावर भर दिला. दोन्ही नेत्यांनी जागतिक आणि प्रादेशिक मुद्यांवरही विचारांची देवाणघेवाण केली. जगातील सर्वाधिक लोकसंख्या आणि चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेला भारत ग्लोबल साउथमध्ये एक नेता म्हणून उदयास येत असल्याचे दक्षिण कोरियाच्या राष्ट्राध्यक्षांनी सांगितले. तसेच जागतिक तणावाच्या काळात भारत आणि दक्षिण कोरिया शांतता आणि स्थिरतेचा संदेश देत असल्याचे पंतप्रधान मोदींनी सांगितले.

क्यूआर कोडमुळे आता पेमेंट सुविधा सुलभ

भारत आणि दक्षिण कोरियाने इलेक्ट्रॉनिक पेमेंट प्रणाली जोडण्यासाठी सामंजस्य करारावर (एमओयू) स्वाक्षरी केली आहे. या करारानंतर दोन्ही देशांचे नागरिक एकमेकांच्या देशांमध्ये प्रवास करताना स्थानिक क्यूआर कोड प्रणाली वापरून पेमेंट करू शकतील. यामुळे प्रवासी, व्यावसायिक आणि पर्यटकांसाठी व्यवहार अधिक सोपे आणि सोयीस्कर होतील. त्याचबरोबर जहाजबांधणी, शाश्वत विकास, पोलाद आणि बंदरे यांसारख्या क्षेत्रांमध्ये अनेक सामंजस्य करार (एमओयू) केल्यामुळे दोन्ही देशांमधील औद्योगिक आणि आर्थिक सहकार्याला नवी चालना मिळेल. सांस्कृतिक आणि सर्जनशील उद्योगांमधील सहकार्यामुळे चित्रपट, अॅनिमेशन आणि गेमिंग यांसारख्या क्षेत्रांमध्येही नवीन संधी निर्माण होतील.

2028 मध्ये मैत्री महोत्सव

भारतात के-पॉप आणि के-ड्रामा अधिकाधिक लोकप्रिय होत आहेत. शिवाय, दक्षिण कोरियामध्ये भारतीय चित्रपट आणि संस्कृतीला मिळणारी ओळख सातत्याने वाढत आहे. दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली हे देखील भारतीय चित्रपटांचे कौतुक करतात, याबद्दल मोदींनी आनंद व्यक्त केला. दोन्ही देशांमधील सांस्कृतिक संबंध अधिक दृढ करण्यासाठी 2028 मध्ये भारत-दक्षिण कोरिया मैत्री महोत्सव आयोजित केला जाईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नमूद केले.

आदरातिथ्याने भारावले द. कोरियन राष्ट्राध्यक्ष

दक्षिण कोरियन राष्ट्राध्यक्ष ली जे-म्युंग यांनी पंतप्रधान मोदी, भारत सरकार आणि भारतीय जनतेने दिलेल्या आदरातिथ्याबद्दल आभार व्यक्त केले. दोन्ही नेत्यांनी कार्यक्रमात उपस्थित असलेल्या उद्योग प्रतिनिधींसोबत ग्रुप फोटोही काढले. तसेच विज्ञान भवनात पंतप्रधान मोदी आणि ली जे-म्युंग यांनी सेल्फीही घेतला.

Comments are closed.