लग्न मिरवणुकीतून पर्यावरण संवर्धनाचा संदेश
पर्यावरण संरक्षण या संकल्पनेचे महत्व अनन्यसाधारण आहे. आज अनेक लोक पर्यावरणच्या दृष्टीने संवेदनशील झाले असून ते अभिनव आणि कृतिशील मार्गांनी पर्यावरण संरक्षणाचा संदेश लोकांना देत आहेत. महाराष्ट्रातील अकोला येथील नागरीक डॉ. विराज यांनीं आपल्या विवाहाची वरातच या संदेशाचे माध्यम बनविली. या वरातीची चर्चा सध्या मोठ्या प्रमाणात सोशल मिडियावर होत आहे. डॉ. विराज यांनी आपल्या विवाहाच्या वरातीमुळे वायू प्रदूषण होऊ नये, म्हणून दक्षता घेतली. त्यांनी आपल्या मित्रांना या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी सायकली घेऊन येण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार त्यांच्या 100 हून अधिक मित्रांनी आणि परिचितांनी ही वरात सायकलींवरुन काढली. स्वत: वरही सायकलवरुनच या वरातीच्या अग्रभागी राहिला. वरासाठी सजवलेली कार किंवा मो टारबाईक्स यांना पूर्णपणे फाटा देण्यात आला होता. त्यामुळे इंधनाची बचत तर झालीच. तसेच वातावरणात धूर न पसरल्याने पर्यावरणाचीही हानीपासून बचाव झाला. अशा प्रकारे एका अभिनव पद्धतीने पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिला गेला.
वराची वरात 19 नोव्हेंबरला काढण्यात आली. सर्व सायकली फुलांनी सजविण्यात आल्या होत्या. वरातीत सहभागी झालेल्यांनी ‘राईड फॉर लव्ह’ असे शब्द असलेले टी-शर्ट परिधान केलेले होते. या वरातीत वराचे कुटुंबिय, वराचे सायकलप्रेमी मित्र, आसपासच्या सायकलींग क्लब्सचे सदस्य, काही सायकलपटू आणि पर्यावरण संरक्षणासाठी काम करणारे कार्यकर्ते यांचा समावेश होता. अशा प्रकारे पर्यावरणस्नेही पद्धतीने वरात काढण्याची प्रेरणा डॉ. विराज यांना त्यांच्या पित्याकडूनच मिळाली. त्यांचे पिता पर्यावरण संरक्षणाचे कार्यकर्ते आहेत. या वरातीतून केवळ पर्यावरण संरक्षणाचा नव्हे, तर उत्तम शरीरस्थाथ्याचा संदेशही जनतेपर्यंत पोहचविण्यात आला. सायकलींग करणे, हा शरीरप्रकृती चांगली राखण्यासाठी एक उत्तम व्यायाम समजला जातो. शक्य होईल तितक्या प्रमाणात बाईक्सवरुन प्रवास न करता सायकलवरुन करावा असा सल्ला डॉक्टर्सही देतात. अशा प्रकारे एकाच कार्यक्रमात पर्यावरण संरक्षण आणि शरीर प्रकृती संरक्षण असे दोन्ही संदेश डॉ. विराज यांनी प्रत्यक्ष कृतीत अग्रभागी राहून इतरांना दिले आहेत.
Comments are closed.