मंत्री आणि पक्ष रोड शो बंद करणार का, ताफे कमी करणार का? काटकसरीचे आवाहन करणाऱ्या पंतप्रधान मोदींना आदित्य ठाकरे यांचा सवाल
देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आर्थिक संकटाचे संकेत दिले. त्याचबरोबर सोने खरेदी करू नये आणि परदेश प्रवास करू नये, असे जनतेला आवाहन केले. यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी केंद्र सरकारला खडे बोल सुनावले. सोनं घेऊ नका, परदेश प्रवास करू नका, बाहेर जाऊन लग्न करू नका. पण त्यांच्या पक्षाचे मंत्री आणि त्यांचा पक्ष हे सर्व पाळणार आहे का? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला.
मोदी सरकारमधील मंत्र्यांचे रोड शो बंद होणार आहेत का? केवळ इतकच नाही तर, हेच मंत्री परदेशी जाणं असेल किंवा सोनं घेणं असेल हे सर्व टाळणार आहेत का? असे प्रश्न आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधताना उपस्थित केले. मुख्य गोष्ट ही आहे की, जे काल पंतप्रधानांनी अपिल केलं ते जनतेने असं करावं तसं करावं असे केलेले आहे. पण महत्त्वाचा प्रश्न म्हणजे जनतेने सर्व काही करावं पण सरकार काय करणार आहे? असा प्रश्न यावेळी आदित्य ठाकरे यांनी विचारला.
विधानभवनात अधिवेशन सुरू होतं तेव्हापासून मी सांगत आलोय. युद्ध सुरू होताच पंतप्रधानांनी भाष्य करावं आणि देशाला काय आर्थिक परिस्थितीतून जावं लागणार आहे याची कल्पना द्यावी, परंतु तेव्हा मात्र कुणी काहीच बोललं नाही, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
सगळ्या निवडणुका झाल्यानंतर पंतप्रधानांनी सांगितलं आहे की, घडी बिघडणार आहे. रुपया आपण पाहतोय घसरत चाललेला आहे. आणि दुसरं म्हणजे वर्क फ्राॅम होम करा या अशा सर्व गोष्टींचा आपल्या आर्थिक घडीवर काय परिणाम होणार आहे, यावर सरकारने विचार केला होता का? कोविडच्या काळात वर्क फ्राॅम होम होतं. कारण बाहेर एक व्हायरस होता म्हणून आपण घरून काम करत होतो. वर्क फ्रॉम होमने इंटरनेट आणि वीजेचा वापर वाढणार आहे. त्याचा सरकारने विचार केलाय का? असे प्रश्न आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून केलेली विशेष अधिवेशनाची मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात प्रश्न विचारला असता, त्यांची मागणी योग्यच आहे. परंतु नशीब अजून ताली बजाओ थाली बजाओ हे झालं नाही, असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला. सरकार जनतेसाठी काय करणार हे मात्र सांगितलं नाही, असे आदित्य ठाकरे यांनी अधोरेखित केले.
Comments are closed.