नवी मुंबईत उद्यापासून दोन दिवस पाणीबाणी, भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्राची देखभाल दुरुस्ती होणार

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

नवी मुंबई शहराला पाणीपुरवठा करणारी मोरबे धरणाची जलवाहिनी आणि भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्राची दोन दिवस देखभाल दुरुस्ती करण्यात येणार आहे. त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा येत्या बुधवारी सकाळी दहापासून ते गुरुवारी सकाळी दहापर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. लागोपाठ दोन दिवस पाणीपुरवठा बंद राहणार असल्याने नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.

प्रत्येक वर्षी पावसाळ्याच्या तोंडावर नवी मुंबई पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून जलवाहिनीसह भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्राची देखभाल दुरुस्ती केली जाते. यंदाही हे काम येत्या बुधवारपासून हाती घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर सीबीडी बेलापूर येथील सेक्टर-२८ मधील पंपगृहात १ हजार ८०० मिलिमीटर व्यासाचा व्हॉल्व बसविणे, भोकरपाडा २.५ दशलक्ष लिटर क्षमतेच्या जलसाठा केंद्रात मुख्य जलवाहिनी जोडणी करणे, भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्रातील मुख्य जलवाहिनीवर २ हजार ४०० मिलिमीटर व्यासाचा व्हॉल्व बसविणे, अडई येथे १ हजार ८०० मिलिमीटर व्यासाचा व्हॉल्व बसविणे, स्काडा अंतर्गत तांत्रिक कामे आणि पावसाळ्यापूर्व विद्युत दुरुस्तीची कामे केली जाणार आहेत. त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा बुधवारी सकाळी दहापासून ते गुरुवारी सकाळी दहापर्यंत २४ तास बंद राहणार आहे.

देखभाल दुरुस्तीच्या कामामुळेबेलापूर, नेरुळ, वाशी, तुर्भे, सानपाडा, कोपरखैरणे, घणसोली आणि ऐरोली या आठही विभागातील पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे.

मोरबे धरणातून पनवेल महापालिका क्षेत्रातील खारघर व कामोठे नोड्समध्येही पाणीपुरवठा केला जातो. दोन दिवस या दोन्ही नोडचा पाणीपुरवठाही बंद ठेवण्यात येणार आहे.

दुरुस्तीचे काम लांबल्यानंतर पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे वेळापत्रक लांबणार आहे. गुरुवारी संध्याकाळी पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतरही तो कमी दाबाने आणि अपुरा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करून महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन अतिरिक्त शहर अभियंता अरविंद शिंदे यांनी केले आहे.

Comments are closed.