Raigad News – आंबेनळी घाटात बाईकचा अपघात, पती-पत्नी 500 फूट खोल दरीत कोसळले; थरारक रेस्क्यू ऑपरेशननंतर मृतदेह काढले बाहेर

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या आंबेनळी घाटात गुरुवारी एका बाईकचा भीषण अपघात झाला होता. या अपघातात बाईकवरील पती-पत्नी खोल दरीत कोसळले होते. या भीषण अपघातानंतर बचाव पथकाने थरारक रेस्क्यू मोहीम राबवत 500 फूट खोल दरीतून बाईकस्वार दाम्पत्यांचे मृतदेह बाहेर काढले.

महाबळेश्वर तालुक्यातील कुंभरोशी गावाजवळ, पोलादपूर हद्दीत हा अपघात घडला. दिनांक २३ एप्रिल रोजी सायंकाळी सुमारे 7 वाजता प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीमचे सदस्य अमित जाधव यांना घाटातील एका धोकादायक वळणावर रस्त्याच्या कडेला संशयास्पद अवस्थेत स्प्लेंडर मोटारसायकल आढळली. बाईक बॅरिकेट्समध्ये अडकलेली असल्याने अपघाताची शक्यता लक्षात येताच त्यांनी तत्काळ सहकाऱ्यांना माहिती दिली. त्यानंतर प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीम आणि महाबळेश्वर ट्रेकर्सच्या सदस्यांनी घटनास्थळी धाव घेत शोधमोहीम सुरू केली.

रेस्क्यू टीमने दोरांच्या साहाय्याने सुमारे 500 फूट खोल दरीत उतरून अत्यंत धोकादायक परिस्थितीत शोधकार्य सुरू केले. अंधार, निसरडे उतार, दाट धुके आणि सुरू असलेला पाऊस यामुळे ही मोहीम अत्यंत कठीण बनली होती. रात्री सुमारे दीड वाजेपर्यंत सुरू असलेल्या अथक प्रयत्नांनंतर प्रथम पुरुषाचा मृतदेह शोधून बाहेर काढण्यात यश आले. मात्र प्रतिकूल हवामान आणि वाढत्या धोक्यामुळे उर्वरित बचावकार्य थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला.

यानंतर 24 एप्रिल रोजी सकाळी सुमारे 9 वाजता पुन्हा बचावमोहीम सुरू करण्यात आली. या मोहिमेत तब्बल तीन तासांच्या अथक मेहनतीनंतर महिलेचा मृतदेहही दरीतून बाहेर काढण्यात आला. या दुर्घटनेत मृतांची ओळख मोहन चव्हाण (वय ५५) आणि जयश्री चव्हाण (वय ४८, रा. सोनगिरवाडी) अशी झाली आहे.

या थरारक बचावकार्यात महाबळेश्वर ट्रेकर्सचे बाबा भाटिया आणि त्यांच्या सहकाऱ्यांसह प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीमचे अजित जाधव, अमित जाधव, ऋषी जाधव, मुन्ना उत्तेकर, दादू बिरामणे, अनिकेत वाघदरे, सौरभ गोळे, संकेत सावंत, सौरभ सालेकर, ओमकार सोनवणे, शरद सावंत, अमित कोळी, सुजित कोळी, दीपक ओंबळे, अखिल शेटे, आशिष बिरामणे, बाबू वाघदरे, सोमनाथ वाघदरे, रोहन जंगम, संगीता कोळी यांनी जीव धोक्यात घालून मोलाचे योगदान दिले.

घटनेची माहिती मिळताच पोलादपूर व महाबळेश्वर पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. यावेळी महाबळेश्वरचे नगरसेवक कुमार शिंदे, पोलादपूरचे तहसीलदार कपिल घोरपडे, स्वप्निल कदम तसेच कुंभरोशी व प्रतापगड परिसरातील युवक कार्यकर्त्यांनीही रात्री उशिरापर्यंत घटनास्थळी उपस्थित राहून सहकार्य केले.

Comments are closed.