माझ्या मुलाचा अर्ज मागे घेतो; मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर अब्दुल सत्तारांचा नूर पलटला

मुंबई : दोन दिवसांपासून भाजपवर सातत्याने टीका करणाऱ्या शिवसेना नेते अब्दुल सत्तारांचा (Abdul Sattar) नूर मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर पलटल्याचं दिसून आलं. जिल्ह्यामध्ये आम्हाला जो काही त्रास झाला तो यापुढे होणार नाही असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी (Devendra Fadnavis) आपल्याला दिलं, त्यामुळे आपण आपल्या मुलाचा अर्ज मागे घेणार असल्याचं अब्दुल सत्तार म्हणाले. तसेच शिवसेनेचे सहा आमदार आणि एक खासदार, सर्वांनी एकत्र राहावं असा आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला असल्याचंही अब्दुल सत्तार म्हणाले.

छत्रपती संभाजीनगर विधान परिषदेची जागा भाजपकडे गेली असून त्या ठिकाणी भाजपने सुहास शिरसाट यांना उमेदवारी दिली आहे. त्यानंतर नाराज झालेल्या अब्दुल सत्तार यांनी त्यांच्या मुलाचा, समीर सत्तार(Sameer Sattar)  यांचा अर्ज दाखल केला होता. तसेच अब्दुल सत्तार यांनी भाजप विरोधात उघड नाराजी व्यक्त करत टीकाही केली होती. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आणि अब्दुल सत्तार यांची मुंबईत भेट झाली. त्यानंतर अब्दुल सत्तार हे त्यांच्या मुलाचा उमेदवारी अर्ज मागे घेण्यास तयार झाले.

Abdul Sattar On Vidhan Parishad Election : काय म्हणाले अब्दुल सत्तार?

मुख्यमंत्र्याच्या भेटीनंतर अब्दुल सत्तार म्हणाले की, “आम्हाला खालच्या स्तरावर जो काही त्रास झाला तो यापुढे होणार नाही याची गॅरंटी मुख्यमंत्र्यांनी दिली. आमच्याकडूनही काही त्रास झाला तर उपमुख्यमंत्री आमचे कान पकडतील. त्यांच्याकडून काही चुका झाल्या असतील तर ते पाहतील. माझी काही नाराजी होती ती मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातली. मुख्यमंत्र्यांनी त्यावर मार्ग काढण्याचं आश्वासन दिलं आहे. आमचे सहा आमदार आणि एक खासदार आहेत. महायुती म्हणून आम्ही सगळे एकत्र कसे काम करता येईल हे यापुढे पाहू.”

मला जे काही बोलायचं ते मी बोललो. आता कार्यकर्त्यांशी चर्चा करून आपण आपल्या मुलाचा अर्ज मागे घेणार असल्याचं अब्दुल सत्तार यांनी स्पष्ट केलं.

Abdul Sattar On BJP : शिवसेना नेत्यांची भाजपवर टीका

या आधी शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी भाजपवर चांगलीच टीका केली होती. भाजप शिवसेनेचं मुंडकं छाटण्याचं काम करत असल्याचा गंभीर आरोप अब्दुल सत्तार यांनी केला होता. भाजपचं वागणं सुधारलं नाहीतर युतीसंदर्भात विचार करावा लागेल अशा शब्दात त्यांनी थेट भाजपला आव्हान दिलं होतं.

अब्दुल सत्तार यांनी भाजपवर टीका केल्यानंतर शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी महायुतीला घरचा आहेर दिला. अब्दुल सत्तार यांची व्यथा खरी असल्याचं आमदार गायकवाडांनी म्हटलं.. एकमेकांचं खच्चीकरण करणं युतीसाठी हिताचं नाही असं आमदार गायकवाड यांनी म्हटलं. आपल्या मतदारसंघातही मित्रपक्षांचा हस्तक्षेप असल्याचा आरोप त्यांनी केला.

सातारा प्रकरणाचा संदर्भ देत  राज्यातल्या दोन कॅबिनेट मंत्र्यांना मारहाण झाल्यानंतर देखील कारवाई झाली नाही हे महाराष्ट्राने बघितलं आहे, असं संजय गायकवाड म्हणाले. अजितदादांच्या निधनानंतर सुनेत्राताई पवार यांना अजूनही अर्थ खातं भाजपकडून मिळालेलं नाही असंही ते म्हणाले.

दरम्यान, अब्दुल सत्तार यांच्या टीकेनंतर त्यावर भाजपकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. त्याचसोबत भाजपच्या नेत्यांनी शिवसेनेला जोरदार प्रत्युत्तरही दिलं. अब्दुल सत्तार यांच्या टीकेवर एकनाथ शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली. त्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी अब्दुल सत्तार यांची भेट घेत त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला.

ही बातमी वाचा:

आणखी वाचा

Comments are closed.