Abhinandan Varthaman's premature retirement
भारतीय हवाई दलाला रामराम : आता खासगी एअरलाईनमध्ये दाखल
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
27 फेब्रुवारी 2019 रोजी नियंत्रण रेषेवर झालेल्या हवाई लढाईत पाकिस्तानी एफ-16 लढाऊ विमान पाडणारे आणि वीरचक्र विजेते अभिनंदन वर्धमान यांनी भारतीय हवाई दल सोडून मुदतपूर्व निवृत्तीचा निर्णय घेतल्याचे गुरुवारी उघड झाले. वर्धमान यांनी हवाई दलाला रामराम ठोकत आता ‘फ्लाय91’ या प्रादेशिक एअरलाईनमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. गोवास्थित फ्लाय-91 ने मार्च 2024 मध्ये आपले कामकाज सुरू केले. सध्या त्यांच्या ताफ्यात सहा ते आठ एटीआर 72-600 विमाने असून, ते गोवा आणि हैदराबाद या दोन केंद्रांमधून कार्यरत आहेत.
2019 मध्ये पाकिस्तानी लढाऊ विमान पाडणारे भारतीय हवाई दलाचे माजी ग्रुप कॅप्टन अभिनंदन वर्धमान आता प्रादेशिक एअरलाईन ‘फ्लाय91’ मध्ये पायलट म्हणून रुजू झाले आहेत. वीरचक्र विजेते अभिनंदन वर्धमान गोवास्थित एअरलाईन ‘फ्लाय91’ मध्ये पायलट म्हणून सामील झाले. ‘फ्लाय91’च्या प्रवक्त्याने यासंबंधी भाष्य करण्यास नकार देताना कर्मचाऱ्यांची वैयक्तिक माहिती ही एक खासगी बाब असल्याचे स्पष्ट केल्यामुळे एअरलाईनमधील त्यांच्या सध्याच्या भूमिकेबद्दल अधिक तपशील तात्काळ उपलब्ध होऊ शकले नाहीत. मात्र, सेवानिवृत्तीनंतर त्यांनी आता एका नवीन प्रवासाला सुरुवात केली आहे.
‘वीरचक्र’ पुरस्काराने गौरव
अभिनंदन यांना 2021 मध्ये युद्धकाळातील शौर्यासाठी दिला जाणारा भारताचा तिसरा सर्वोच्च शौर्य पुरस्कार ‘वीरचक्र’ प्रदान करण्यात आला. या प्रशस्तीपत्रात हवाई युद्धादरम्यान त्यांच्या ‘कर्तव्याप्रती असलेल्या अपवादात्मक निष्ठे’ची दखल घेण्यात आली. पाकिस्तानसोबत 2019 मध्ये झालेल्या हवाई युद्धानंतर वर्धमान प्रकाशझोतात आले. त्या हवाई युद्धादरम्यान त्यांनी एक पाकिस्तानी लढाऊ विमान पाडले होते. मात्र, या चकमकीत त्यांना भारतीय सीमेजवळ विमानातून बाहेर पडावे लागले होते. पाकिस्तानी हद्दीत असल्याने त्यांना शेजारील देशात तीन दिवस ताब्यात ठेवण्यात आले होते.
पाकिस्तानसोबतच्या संघर्षात ‘अभिनंदनी’य कामगिरी
फेब्रुवारी 2019 मध्ये अभिनंदन वर्धमान यांनी एक पाकिस्तानी लढाऊ विमान नष्ट केले होते. त्यावेळी ते मिग-21 बायसन स्क्वाड्रनमध्ये तैनात होते. तसेच श्रीनगर हवाई दल स्थानकावर ‘ऑपरेशनल रेडीनेस प्लॅटफॉर्म’ कर्तव्यावर होते. त्याचवेळी, पाकिस्तान हवाई दलाच्या लढाऊ विमानांचा एक गट नियंत्रण रेषेकडे आल्यानंतर अभिनंदन वर्धमान यांना ती रोखण्यासाठी पाठवण्यात आले. त्यांनी शत्रूच्या लढाऊ विमानांशी संघर्ष करत त्यांचा पाठलाग करत नष्ट केले होते. हवाई लढाईदरम्यान, अभिनंदन यांनी एक एफ-16 विमान पाडले. मात्र, या संघर्षात एका शत्रू विमानाने अनेक अत्याधुनिक बीव्हीआर क्षेपणास्त्रs डागल्यामुळे ते शत्रूच्या प्रदेशात अडकून पडले. शत्रूच्या प्रदेशात त्याचे लढाऊ विमान कोसळल्यानंतर त्यांना पाकिस्तानी सैन्याने पकडले. परंतु तत्कालीन भाजप सरकारच्या यशस्वी कूटनीतीमुळे तत्कालीन पंतप्रधान इम्रान खान यांनी अभिनंदन वर्धमान यांची काही तासातच सुटका केली होती. अभिनंदन ज्या हवाई लढाईत सामील होते, ती भारतीय हवाई दलाच्या मिराज-2000 विमानांनी पाकिस्तानच्या बालाकोटमधील लक्ष्यांवर हल्ला केल्यानंतर दुसऱ्या दिवशी झाली होती. हा हल्ला 14 फेब्रुवारी 2019 रोजी काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या आत्मघाती हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून करण्यात आला होता. या हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) 40 जवान हुतात्मा झाले होते.
Comments are closed.