मिरा रोडमध्ये सुरक्षा रक्षकांवर चाकूहल्ला करणारा आरोपी सेल्फ-रॅडिकलाइज्ड, मुख्यमंत्र्यांची माहिती

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

मुंबईजवळील मिरा रोड परिसरात धक्कादायक घटना घडली आहे. एका 31 वर्षीय तरुणाने दोन सुरक्षा रक्षकांवर चाकूने जीवघेणा हल्ला केला. याआधी आरोपीने रक्षकांना त्यांचे नाव आणि धर्म विचारला, त्यानंतर त्यांना ‘कलमा’ वाचता येतो का? अशी विचारणा केली. सुरक्षा रक्षकांनी नकार देताच आरोपीने त्यांच्यावर चाकूने वार केले. या हल्ल्यात राजकुमार मिश्रा आणि सुब्रतो सेन हे दोन रक्षक जखमी झालेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

मिरा रोड पोलिसांनी अत्यंत तत्परतेने कारवाई करत सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपी जैब जुबेर अन्सारी याला घटनेनंतर दीड तासात बेड्या ठोकल्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तो नया नगर परिसरातील एका भाड्याच्या घरात राहत होता. अन्सारी हा उच्चशिक्षित असून त्याने 2019 पर्यंत अमेरिकेत शिक्षण घेतले होते. काही महिन्यांपूर्वीपर्यंत तो एका कोचिंग सेंटरमध्ये रसायनशास्त्र आणि गणित विषय शिकवत होता. पण गेल्या काही दिवसांपासून त्याच्या वागण्यात बदल झाला होता.

दरम्यान, या घटनेचा तपास सुरू असताना एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपी अन्सारी त्याच्या मोबाईलवर वारंवार ‘ISIS’ या दहशतवादी संघटनेशी संबंधित प्रचार व्हिडिओ पाहायचा. या हल्ल्यामागे दहशतवादी कनेक्शन आहे का? याचा शोध घेण्यासाठी आता या प्रकरणाचा तपास महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाकडे (ATS) सोपवण्यात आला आहे. एटीएस आणि स्थानिक पोलीस संयुक्तपणे या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या घटनेचा प्राथमिक तपास पाहता, आरोपी हा ‘सेल्फ-रॅडिकलाइज्ड’ (स्वतःहून कट्टरपंथी विचारांकड वळलेला) असल्याचे दिसून येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी मंगळवारी स्पष्ट केले. आरोपीने इंटरनेटवरील व्हिडीओ, विविध पुस्तके आणि ऑनलाइन कंटेंटच्या प्रभावाखाली येऊन हे पाऊल उचलले होते, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. राष्ट्रीय तपास यंत्रणेसह (NIA) इतर केंद्रीय यंत्रणाही या प्रकरणात तपास करत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

फडणवीस पुढे म्हणाले की, हा हल्ला पूर्णपणे ‘जिहादी’ मानसिकतेतून करण्यात आला असून धार्मिक ओळखीवरून सुरक्षा रक्षकांना लक्ष्य करण्यात आले होते. दुसऱ्या समुदायाच्या लोकांना इजा पोहोचवण्याच्या उद्देशानेच हा कट रचला गेल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. सध्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. या कट्टरपंथी विचारांमागे एखादे मोठे नेटवर्क सक्रिय आहे का, याचा शोध आता तपास यंत्रणा घेत असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

Comments are closed.