प्रकल्पग्रस्तांच्या सदनिका वाटपात गैरव्यवहार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, संजय राऊत यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुंबईतील प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसन योजनेत (PAP) मंत्र्यांच्या शासकीय लेटरहेडचा वापर करून शंभर कोटींहून अधिक रुपयांचा घोटाळा सुरू असल्याचा खळबळजनक आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते खासदार संजय राऊत यांनी केला आहे. मुंबईचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या शिफारस पत्राचा आधार घेऊन बोगस लाभार्थ्यांना घरांचे वाटप केले जात असून, यात प्रकल्पग्रस्तांवर अन्याय होत असल्याचा दावा संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात केला आहे. तसेच प्रकल्पग्रस्तांच्या सदनिका वाटपात गैरव्यवहार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी राऊत यांनी केली आहे.

संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले असून X वर पोस्ट केले आहे. संजय राऊत यांनी आपल्या पत्रात या घोटाळ्याची कार्यपद्धती स्पष्ट करताना सांगितले की, मुंबई व उपनगरातील विकासकामांत अडथळे ठरणाऱ्या बांधकामांना हटवून तेथील बाधितांना ‘पीएपी’ योजनेंतर्गत घरे मिळावीत ही सरकारची भूमिका आहे. पण झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण एम.एम.आर.डी.ए., बृहन्मुंबई महानगरपालिका, म्हाडा या सर्व कार्यालयांवर दबाव आणून भ्रष्ट मार्गाने चुकीच्या लोकांना सदनिका देण्याचे रॅकेट सुरू आहे. त्यासाठी ‘सकल हिंदू समाज’ ही संस्था दलालाची भूमिका बजावत असल्याचे राऊत यांनी पत्रात नमूद केले.

सकल हिंदू समाजाने बोगस सदनिकाधारकांची नावे स्वतःच्या लेटर हेडवर द्यायची व त्या शिफारशीला मुंबईचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांचे शिफारसपत्र जोडून त्या मार्गे सर्व प्राधिकरणात दबाव आणायचे व बोगस लोकांना सदनिका विकून लाखो रुपयांचे कमिशन खायचे असा हा प्रकार सुरू असल्याचा आरोप राऊत यांनी केला. कुणी एक वीरेंद्र प्रताप ऊर्फ बबलू सिंह हा सकल हिंदू समाजाच्या नावाने हे उद्योग करतो. त्यामुळे मूळ प्रकल्पग्रस्त त्यांच्या निवारा मिळण्याच्या हक्कापासून वंचित रहिले आहेत व या गैरकामात मंत्री मंगल प्रभात लोढांचा वापर होत आहे. बनावट कागदपत्रे, बनावट सही-शिक्के, बनावट ओळखपत्रे तयार करून सदनिका लाटण्याचा आणि विकण्याचा गोरखधंदा सुरू आहे व या ‘रॅकेट’वर कठोर कारवाई होणे गरजेचे असल्याचे राऊत यांनी पत्रात म्हटले आहे.

या गंभीर तक्रारीत राऊत यांनी गोवंडी पूर्व येथील हनुमान मंदिर परिसरातील समर्पण सोसायटीचे थेट उदाहरण दिले आहे. येथे बबलू सिंहने अस्तित्वात नसलेल्या अजित धनाजी कदमच्या नावाने तक्रार अर्ज केला व या सोसायटीतील चार प्रकल्पग्रस्तांच्या सदनिका क्र. 102, 103, 104 चे वाटप सुरेश नारायण गुप्ता, अनिल गुप्ता, शिला लालमन गुप्ता यांना करून प्रत्येकी 10 ते 15 लाख उकळले. हा सर्व व्यवहार बनावट आहे व अशा बनावट व्यवहारास प्राधान्य देऊन, शिफारस करण्याचे काम मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या लेटर हेडचा वापर करून सुरू असल्याचे राऊत म्हणाले.

मुंबई व उपनगरात अशा पद्धतीने शंभरावर सदनिकांचा गैरव्यवहार झाला आहे. मूळ प्रकल्पग्रस्तांना डावलून भलत्याच बोगस लोकांना सदनिका देण्यात आल्या. एम.एम.आर.डी.ए., महापालिका, झोपडपट्टी पुनर्वसन खाते अशा सगळ्यांची फसवणूक किंवा संगनमत करून मंत्र्यांच्या लेटर हेडचा गैरवापर करून झालेला हा सदनिका घोटाळा शंभर कोटींच्या वर आहे. त्य़ामुळे ही बाब अत्यंत गांभीर्याने घेण्याची विनंती संजय राऊत यांनी आपल्या पत्राद्वारे मुख्यमंत्री फडणवीस यांना केली आहे.

Comments are closed.