नवी मुंबई पालिका रुग्णालयात १८०० रुपयांत एमआरआय, गोरगरीब रुग्णांना मोठा दिलासा

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

नवी मुंबई महापालिकेच्या वाशी येथील प्रथम संदर्भ रुग्णालयात एमआरआय चाचणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे शहर आणि परिसरातील गोरगरीब रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. खासगी रुग्णालयात किंवा लॅबमध्ये एमआरआय चाचणी करण्यासाठी रुग्णांना १२ ते १५ हजार रुपये मोजावे लागतात. मात्र नवी मुंबई पालिका रुग्णालयात ही चाचणी फक्त १ हजार ८०० रुपयांमध्ये होणार आहे. एमआरआय विथ कॉन्ट्रास्ट टेस्टसाठी रुग्णांना ९ हजार ८५० तर एमआरआय विदाऊट कॉन्ट्रास्टसाठी १ हजार ७७५ रुपये शुल्क द्यावे लागणार आहे.

मेंदू आणि मज्जासंस्था, पाठीचा कणा आणि सांधे, हृदय, यकृत, मूत्रपिंड, स्वादुपिंड असे अंतर्गत अवयव, कर्करोग, रक्तवाहिन्यांचे आजार अशा विविध आजारांच्या निदानासाठी एमआरआय चाचणी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. साधारणतः १५ हजारांपासून अधिक खर्च असलेली ही महाग चाचणी नवी मुंबई महापालिका प्रशासनाने नागरिकांना अत्यंत सवलतीच्या दरात उपलब्ध करून दिली आहे. आरोग्य सेवा सुधारणा व सक्षमीकरण उपक्रमांतर्गत अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज श्री टेस्ट मशीन नवी मुंबई महापालिकेने खरेदी केली असून ही सुविधा बाह्ययंत्रणे द्वारे चालविली जाणार आहे. वाशी रुग्णालयात सुरू होणाऱ्या या एमआरआय सुविधेला मिळणारा प्रतिसाद लक्षात घेऊन इतरही रुग्णालयांमध्ये ही सुविधा सुरू करणार असल्याचे पालिकेचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी सांगितले.

नवजात बालकांच्या आरोग्याच्या दृष्टीने ‘न्यू बॉर्न स्क्रीनिंग’ ही तपासणी सुरू करणार असून, जन्मानंतर लगेच काही आजारांचे निदान करणे यामुळे शक्य होणार आहे.

हृदय व रक्तवाहिन्यांच्या आजारांवरील उपचारांसाठी बाय-प्लेन कॅथलॅब उभारणार. ऐरोली येथे सिंगल प्लेन कॅथलॅबची सुविधा उपलब्ध होणार. त्यामुळे अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी आणि स्ट्रोकवरील उपचारही करता येणार आहेत.

Comments are closed.