मुंबई इंडियन्स प्लेऑफ्सच्या शर्यतीतून बाहेर पडल्यानंतर हेड कोच जयवर्धनेचा मोठा खुलासा, हार्दिक-सूर्याला संघातून…

आयपीएल २०२६ हंगामातून पाच वेळेचा विजेता मुंबई इंडियन्स प्लेऑफ्सच्या शर्यतीतून बाहेर झाला आहे. रविवारी (१० मे) गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने त्यांचा २ विकेट्सने पराभव केला आणि त्यांचे प्लेऑफ्समध्ये पोहोचण्याचे स्वप्न भंगले. यामुळे मुंबईच्या संघात काही बदल होणार का? रोहित शर्मा, हार्दिक पांड्या आणि सूर्यकुमार यादव यांना संघातून बाहेर करणार का अशा चर्चा सुरू झाल्या, यावर संघाचे मुख्य प्रशिक्षक माहेला जयवर्धने यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

आरसीबी विरुद्धच्या पराभवानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत जयवर्धने यांना वरिष्ठ खेळाडूंच्या निराशाजनक कामगिरीबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावर ते उत्तरले, “संघातील मुख्य खेळाडूंचा गट खूप मौल्यवान आहे. संघ महत्त्वाचा असून तुम्ही त्यात सतत बदल करत राहु शकत नाही. आम्ही आत्मविश्वासाने आणि दृढ निश्चयाने मैदानात उतरलो. त्यापलीकडे जाणे कठीण आहे, त्यामुळे शंका घेण्याचे आमच्याकडे कोणतेही कारण नाही. ते विश्वचषकातून परत आले आहेत आणि तो एक उत्तम विश्वचषक होता. त्यांनी तो जिंकला आणि ते एक संघ म्हणून खेळले.”

“हा हंगाम वाईट ठरला. आम्हाला संधी मिळाल्या, मात्र आम्ही त्याचे सोने करू शकलो नाही. आमच्या कामगिरीत सातत्याचा अभाव होता. फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्हीमध्ये आम्ही सातत्यपूर्ण कामगिरी करू शकलो नाही, ज्यामुळे आमचा पराभव झाला”, असेही जयवर्धने यांनी पुढे म्हटले आहे.

एमआयला आरसीबीविरुद्ध शेवटच्या षटकात १५ धावांचा बचाव करायचा होता, मात्र त्यांचा अष्टपैलू राज अंगद बावा त्याच अपयशी ठरला. त्याबद्दल जयवर्धने म्हणाले, “त्यावेळी आमच्या सर्व गोलंदाजांनी त्यांच्या षटकांचा कोटा पूर्ण केला होता. आमच्याकडे एकही अनुभवी गोलंदाज उरला नव्हता. सूर्यकुमार यादवने राजवर विश्वास दाखवला. तो एक उत्तम गोलंदाज असून त्यावेळी तोही दबावाखाली होता. सामना अटीतटीचा होता. आम्ही कदाचित थोडी अधिक चांगली कामगिरी करायला पाहिजे होती.”

रायपूरमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात एमआयने प्रथम फलंदाजी केली. त्यांनी तिलक वर्माच्या ५७ धावा आणि नमन धीरच्या ४७ धावांच्या जोरावर २० षटकांत ७ विकेट्स गमावत १६६ धावा केल्या. वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने ४ षटकांत २३ धावा देत रोहित शर्मा (२२), रायन रिकल्टन (२), तिलक आणि सूर्यकुमार यादव (०) यांना बाद केले. लक्ष्याचा पाठलाग करताना आरसीबीकडून कृणाल पांड्याने प्रभावी फलंदाजी केली. त्याने ७३ (४६) धावा केल्या. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्यात आरसीबी जिंकला आणि एमआय प्लेऑफ्सच्या शर्यतीतून बाहेर झाले.

Comments are closed.