रोहितनंतर सूर्या… आयसीसी ट्रॉफी जिंकल्यानंतर टीम इंडियाच्या कर्णधारांच्या बाबतीत 'हा' विचित्र योगायोग!
आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करणे हे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते. आपल्या देशासाठी खेळल्यानंतर अनेकदा खेळाडू संघाचे कर्णधार बनण्याची अपेक्षा बाळगतात आणि ते पण पूर्ण होते. कर्णधार झाल्यानंतर देशाला विश्वचषक जिंकून देण्याचा प्रयत्न होतो आणि ते ही स्वप्न पूर्ण होते, मात्र विश्वचषकाची ट्रॉफी जिंकल्यानंतर कर्णधारपद गमावणे, याला काय म्हणाल? त्या खेळाडूला दुर्दैवी म्हणणे योग्य ठरेल. असे भारतीय क्रिकेट संघात सलग तिसऱ्या वर्षी झाले आहे, जेव्हा कर्णधाराने आयसीसी ट्रॉफी जिंकली आणि त्याच्या पुढच्याच सामन्यात त्याचे कर्णधारपद गेले आहे.
या प्रकाराची सुरूवात 2024 च्या टी 20 विश्वचषकापासून झाली. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने टी20 विश्वचषक जिंकला. त्यानंतर भारताच्या पुढील टी20 सामन्यात तो कर्णधार नव्हता, एवढेच नाही तर त्याने आंतरराष्ट्रीय टी 20 मधून थेट निवृत्तीच घेतली. 2025 मध्येही त्याच्यासोबत असेच काही घडले. रोहितच्याच नेतृत्वाखाली भारताने 2025 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आणि पुन्हा एकदा पुढच्या वनडे सामन्यात तो कर्णधार नव्हता. बीसीसीआयने शुबमन गिलला वनडे संघाचा कर्णधार केले.
रोहित सध्या भारताच्या वनडे संघाचा भाग आहे, मात्र जेव्हा त्याने आयसीसी ट्रॉफी जिंकली, त्यानंतर त्याला कर्णधारपदावरून काढण्यात आले. आता असेच सूर्यकुमार यादव याच्याबाबतीत घडताना दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सूर्यकुमारला भारताच्या टी 20 संघाच्या कर्णधारपदावरून काढण्यात आले आहे. त्यानेही 2026 मध्ये भारताच्या विजयी टी20 विश्वचषक संघाचे नेतृत्व केले होते आणि आता त्यालाही भारताच्या पुढच्या टी 20 सामन्यात संघाचे कर्णधारपद भुषवता येणार नाही.
सूर्यकुमारचे भारताच्या टी 20 संघातील स्थान निश्चित नाही, यामुळे तो पुढच्या टी 20 सामन्यात कर्णधार नसेल. सध्यातरी मात्र टीम इंडियाचा कर्णधार झाल्यावर आयसीसी ट्रॉफी जिंकावी आणि नंतर कर्णधारपद गमवावे, हा एक वेगळाच मुद्दा बनला आहे. सूर्यकुमारची जागा एका अशा खेळाडूला दिली जाणार आहे, जो दोन ते तीन वर्षांपासून भारताच्या टी20 संघातही नव्हता. भारताच्या टी 20 संघाचा कर्णधार म्हणून श्रेयस अय्यरचे नाव अधिक चर्चेत आहे, तर तिलक वर्मा उपकर्णधार म्हणून. येत्या काही दिवसांतच भारतीय निवडकर्ते आयर्लंड दौऱ्यासाठी संघाची घोषणा करतील, तेव्हा सर्वकाही स्पष्ट होईलच.
Comments are closed.