भोंदूगिरीचा फटका; रुपाली चाकणकरांची गच्छंती, आता महिला आयोगाचा पुढचा चेहरा कोण? रोहित पवारांनी

मुंबई: नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात (Ashok Kharat) याच्याशी असलेल्या जवळिकीमुळे अखेर रुपाली चाकणकर यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. खरातला ‘गुरुमाऊली’ मानून त्याची पाद्यपूजा करणं चाकणकरांना चांगलंच महागात पडलं असून, या प्रकरणावरून महायुती सरकारवर विरोधकांनी हल्लाबोल केला. चाकणकरांच्या राजीनाम्यानंतर आता या महत्त्वाच्या पदावर कोणाची वर्णी लागणार, याची चर्चा रंगली असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी अत्यंत महत्त्वाची नावे सुचवली आहेत.(Ashok Kharat)

चमकोगिरी नको, अभ्यासू नेतृत्व द्या!

रोहित पवार यांनी चाकणकर यांच्या कार्यकाळातील ‘चमकोगिरी’वर सडकून टीका केली. महिला आयोगाला राजकीय आखाडा न बनवता तिथे निष्पक्ष आणि कायद्याचे ज्ञान असलेल्या व्यक्तीची गरज असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले. रोहित पवारांनी सुचवलेली संभाव्य नावे खालीलप्रमाणे आहेत:

मीरा बोरवणकर: निवृत्त आयपीएस (IPS) अधिकारी, ज्यांची ओळख निर्भीड आणि कडक प्रशासक म्हणून आहे.

ॲड. वर्षा देशपांडे: सामाजिक क्षेत्रातील मोठे नाव आणि महिलांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या कार्यकर्त्या.

मनिषा गुप्ते: ‘मासूम’ संस्थेच्या माध्यमातून सामाजिक कार्यात सक्रिय.

मेधा गाडगीळ: प्रशासकीय अनुभव असलेल्या निवृत्त आयएएस (IAS) अधिकारी.

निर्णय ‘सुनेत्रा काकीं’नीच घ्यावा, भाजपचा हस्तक्षेप नको?

पुढच्या अध्यक्षांची निवड करताना रोहित पवारांनी एक गुगली टाकली आहे. “हा निर्णय सर्वस्वी सुनेत्रा काकींनाच (सुनेत्रा पवार) घ्यायचा आहे,” असे सांगत त्यांनी या प्रक्रियेत कोणी ढवळाढवळ करू नये, असा सूचक इशारा दिला आहे. सुनेत्रा पवार महिलांच्या प्रश्नावर योग्य आणि अराजकीय निर्णय घेतील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

पादुकांची पूजा आणि राजीनामा

अशोक खरातला पांडुरंग मानून त्याचे आशीर्वाद घेणारे चाकणकरांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. खरातचे काळे कारनामे आणि अघोरी कृत्ये समोर आल्यानंतर महिला आयोगाच्या अध्यक्षांनी एका भोंदू बाबाची पाठराखण करणे सरकारला अडचणीचे ठरले. परिणामी, त्यांना खुर्चीवरून पायउतार व्हावे लागले. एखाद्या वाईट घटनेतून (खरात प्रकरण) जर आयोगाला मीरा बोरवणकर किंवा मेधा गाडगीळ यांच्यासारख्या सक्षम महिला अध्यक्षा मिळाल्या, तरच राज्यातील पीडित महिलांना खऱ्या अर्थाने न्याय मिळेल, असा विश्वास रोहित पवारांनी व्यक्त केला आहे.

रोहित पवारांची सोशल मिडीया पोस्ट

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर चमकोगिरी करणाऱ्यापेक्षा निवृत्त IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांच्यासारख्या निष्पक्ष, निर्भिड आणि कायद्याचं सखोल ज्ञान असलेल्या किंवा ॲड. वर्षा देशपांडे यांच्यासारख्या सामाजिक क्षेत्रात मोठं काम असलेल्या किंवा ‘मासूम’च्या मनिषा गुप्ते किंवा निवृत्त IAS अधिकारी मेधा गाडगीळ यांची किंवा यांच्यासारख्या इतर योग्य अराजकीय व्यक्तींची नेमणूक करणं गरजेचं आहे. तरच राज्यातील पिडीत महिलांना खऱ्या अर्थाने न्याय मिळेल आणि एखाद्या वाईटातूनही चांगलं घडल्याचं समाधान मिळेल..! हा निर्णय सर्वस्वी मा. सुनेत्राकाकींना घ्यायचाय आणि त्या योग्य निर्णय घेतील, ही अपेक्षा!

आणखी वाचा

Comments are closed.