Mumbai Rain Update – दमदार पावसामुळे ‘विहार’ पाठोपाठ ‘तुळसी’ तलाव ओसंडून वाहू लागला

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 तलावांपैकी एक आणि बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातच असणाऱ्या दोन तलावांपैकी एक असणारा ‘तुळशी तलाव’ मंगळवार, दिनांक 7 जुलै 2026 रोजी रात्री 11:43 वाजता पूर्ण ओसंडून वाहू लागला आहे. मुंबईत होत असलेल्या दमदार पावसामुळे मंगळवार, दिनांक 7 जुलै 2026 च्या रात्री 9 वाजता ‘विहार’ तलाव ओसंडून वाहू लागला, आणि त्या पाठोपाठ लगेचच रात्री 11 वाजून 43 मिनिटांनी ‘तुळशी’ तलाव देखील ओसंडून वाहू लागला आहे. मात्र, असे असले तरीही मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावातील एकूण जलसाठा हा कमाल क्षमतेच्या 41.43 टक्के इतका झाला आहे.

तुळशी तलाव हा गेल्या वर्षी दिनांक 16 ऑगस्ट 2025 रोजी भरून वाहू लागला होता. तर सन 2024 मध्ये हा तलाव 4 ऑगस्ट रोजी भरून वाहू लागला होता. 804.6 कोटी लीटर अर्थात 8046 दशलक्ष लीटर उपयुक्त जलधारण क्षमता असणारा हा तलाव बृहन्मुंबई महापालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांपैकी सर्वात लहान तलाव असून यातून दररोज सरासरी 18 दशलक्ष लीटर (1.8 कोटी लीटर) एवढ्या पाण्याचा पुरवठा केला जातो. गेल्या काही दिवसात या तलावाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे हा तलाव भरून वाहू लागला आहे, अशी माहिती महानगरपालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे देण्यात आली आहे.

तुळशी तलावाबाबत महत्त्वाची माहिती संक्षिप्त स्वरुपात पुढीलप्रमाणे :-

– बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयापासून साधारणपणे 35 किलोमीटर (सुमारे 22 मैल) अंतरावर हा तलाव आहे.

– या कृत्रिम तलावाचे बांधकाम सन 1879 मध्ये पूर्ण झाले.

– या तलावाच्या बांधकामासाठी सुमारे 40 लाख रुपये एवढा खर्च तेव्हा आला होता.

– या तलावाचे पाणलोट क्षेत्र हे सुमारे 6.76 किलोमीटर असून तलाव पूर्ण भरलेला असल्यास पाण्याचे क्षेत्रफळ हे सुमारे 1.35 चौरस किलोमीटर एवढे असते.

– तलाव पूर्ण भरलेला असताना तलावाचा उपयुक्त पाणीसाठा हा 804.6 कोटी लीटर एवढा असतो. (8046 दशलक्ष लीटर)

– तुळशी तलाव पूर्ण भरून ओसंडून वाहणारे पाणी हे विहार तलावाला जाऊन मिळते.

Comments are closed.