NEET परीक्षेत कमी गुण मिळाल्याने अंकिताने जीवन संपवलं; चिठ्ठी वाचून कुटुंबीयांचा आक्रोश, म्हणाल
अहिल्यानगर NEET विद्यार्थी गुन्हे बातम्या: अहिल्यानगरच्या कर्जत तालुक्यातील जलालपूर येथे नीट परीक्षेतील (NEET Exam Result 2026) अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्याच्या नैराश्यातून एका विद्यार्थिनीने स्वतःचे जीवन संपवल्याची दुर्दैवी घटना घडली. अंकिता सांगळे (Ahilyanagar NEET Student Ankita Sangle) असं गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. अंकिताला NEET परीक्षेत 166 गुण मिळाले होते. अंकिताच्या आत्महत्येमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
कर्जत तालुक्यातील जलालपूर येथील अंकिता सांगळे ही विद्यार्थिनी नीट परीक्षेची तयारी करत होती. परीक्षेचा निकाल लागल्यानंतर अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्याने ती मानसिक तणावात असल्याचे समोर आले आहे. अंकिताच्या घरची परिस्थिती जेमतेम आहे. वडील ड्रायव्हर आहेत, तर आई शिवणकाम करते, अशा परिस्थितीतही तिच्या अभ्यासासाठी घरच्यांनी स्वतंत्र खोली तिला दिली होती, 25 जुलैला अंकिता तिच्या खोलीत अभ्यास करत असताना बराच वेळ होऊनही तिचा आवाज न आल्याने घरच्यांनी खोलीचे दार उघडले असता अंकिताने खोलीत गळफास घेतल्याचे त्यांनी पाहिले. (Ahilyanagar NEET Student Crime News)
अंकिताने ज्या खोलीत अभ्यास केला, मेहनत घेतली त्याच खोलीत जीवन संपवलं- (Ahilyanagar NEET Student Ankita Sangle)
अंकिताने हे टोकाचे पाऊल उचलले तेव्हा तिचे वडील पंढरपूरला गेले होते. त्यांना ही घटना समजाच त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. डोळ्यात डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहात अंकिताने ज्या खोलीत अभ्यास केला, मेहनत घेतली त्याच खोलीत तिने आपली जीवनयात्रा संपवली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करत पुढील तपास सुरू केला. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली असून नातेवाईक आणि नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, स्पर्धा परीक्षामुळे विद्यार्थ्यांवर मानसिक ताण येतोय तो कमी करण्यासाठी पालक, शिक्षक आणि समाजाने संवेदनशीलपणे साथ देण्याची गरज या घटनेने पुन्हा अधोरेखित केली आहे.
अंकिताने सुसाईड नोट लिहीत घरच्यांची मागितली माफी- (Ankita Sangle Student News)
तुम्ही मला एवढा जीव लावला, पण मी तुमची एकपण इच्छा पूर्ण करू शकले नाही…मम्मी तू तर प्रत्येक संकटात मैत्रीण म्हणून साथ दिली… दादा तू पण मला खूप साथ दिली… मम्मी, पापा पेक्षा तू जास्त जीव लावला…माझ्या आत्महत्येला तुम्ही जबाबदार नाही आहात… तुम्ही मला जे सुख दिलंय ते मी कधीच विसरू शकत नाही… दादा तू मम्मी पप्पांना चांगलं सांभाळ, त्यांना कोणत्या गोष्टीची कमी पडू देऊ नको…तू ही आनंदी रहा..तुम्ही आनंदी राहा… माझं काही चुकलं असेल तर माफ करा… तुम्हाला मी कोणतच सुख देऊ शकले नाही…आधीच मी NEET चा अभ्यास करत होते, तेव्हा पण सगळं काही त्याग केला तुम्ही… आणि मी काय केलं? तुमची इच्छा पूर्ण नाही करू शकले…आता कसला त्रास करून घेऊ नका…आनंदी राहा…तुमची दिदी, अंकिता, असं सुसाईड नोटमध्ये म्हटलं आहे.
राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:
संबंधित बातमी:
Comments are closed.