AI च्या मदतीने बनावट दस्त, 25 कोटींची जमीन परस्पर विकली, छ. संभाजीनगर-जालन्यात मोठं रॅकेट
छत्रपती संभाजीनगर : तंत्रज्ञान जसं माणसाचं काम सोपं करत आहे, तसंच ते गुन्हेगारांचेही हत्यार बनू लागलं आहे. छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) आणि जालना जिल्ह्यातून एआय म्हणजेच आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा (Artificial Intelligence) वापर करून कोट्यवधी रुपयांच्या जमिनी लाटल्याचा एक अतिशय धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या हायटेक बनावट दस्तऐवज घोटाळ्याने अनेकांच्या पायाखालची जमीनच सरकली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, नाशिकच्या मालेगावमधील एका अट्टल टोळीने एआय तंत्रज्ञानाचा आणि बनावट कागदपत्रांचा आधार घेत 20 ते 25 कोटी रुपयांची मालमत्ता मूळ मालकाला थांगपत्ता लागू न देता परस्पर विकल्याचा आरोप आहे.
AI Land Scam Modus Operandi : असा झाला कोट्यवधींचा घोटाळा
या रॅकेटचा बळी ठरलेले अलिअजगर पेटीवाला हे संभाजीनगरच्या हिरापूर (शिरपूर) परिसरातील 5 एकर 11 गुंठे जमिनीचे मालक आहेत. आजच्या बाजारभावानुसार या जमिनीची किंमत 20 ते 25 कोटी रुपयांच्या घरात आहे.
ठकसेनांनी तब्बल 40 ते 45 लाख रुपयांची मोठी स्टॅम्प ड्युटी भरून या जमिनीचे ‘गिफ्ट डीड’ म्हणजेच हिबानामा (बक्षीसपत्र) दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर करून घेतले. वरवर पाहिलं तर या अधिकृत गिफ्ट डीडवर अलिअजगर पेटीवाला यांचाच फोटो दिसत होता. मात्र, प्रत्यक्षात एआय टूल्सच्या मदतीने पेटीवाला यांच्यासारखाच हुबेहूब दिसणारा चेहरा (Deepfake) तयार करून नोंदणी कार्यालयात दुसरीच डमी व्यक्ती उभी करण्यात आली होती.
पीडित पेटीवाला यांनी तपास यंत्रणांना दिलेल्या माहितीनुसार, ज्या दिवशी हा खरेदी-विक्रीचा व्यवहार झाला, त्या दिवशी ते स्वतः एका नातेवाईकाला भेटण्यासाठी रुग्णालयात गेले होते, ज्याचे सीसीटीव्ही फुटेज त्यांनी पोलिसांना दिले आहे. विशेष म्हणजे पायाच्या शस्त्रक्रियेमुळे पेटीवाला यांना सरळ चालता येत नाही. परंतु, नोंदणी कार्यालयात स्वतःला पेटीवाला म्हणून सादर करणारी एआय-निर्मित डमी व्यक्ती अगदी सामान्यपणे चालताना व्हिडीओत दिसत आहे.
AI Land Scam Racket : मालेगावची टोळी सक्रिय; आतापर्यंत 16 गुन्हे
मिळालेल्या माहितीनुसार, या आंतरजिल्हा रॅकेटचं जाळे अत्यंत मोठं आहे. एआयचा वापर करून जमिनीचे परस्पर व्यवहार करणाऱ्या या टोळीचे अलिअजगर पेटीवाला हे एकमेव सावज नाहीत. ज्या जमिनींचे मालक परदेशात राहतात किंवा जे मालक आपल्या मालमत्तेकडे अनेक वर्षे फिरकले नाहीत, अशा जमिनी आधी शोधल्या जातात. त्यानंतर मूळ मालकांप्रमाणेच हुबेहूब बनावट व्यक्ती तयार करून कोट्यवधींचा चुना लावला जातो. यामध्ये जमीन मालकांसोबतच ती जमीन विकत घेणाऱ्या निष्पाप ग्राहकांचेही मोठं आर्थिक नुकसान झालं आहे.
पेटीवाला यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तात्काळ चक्र फिरवून जुनेद खान आणि मोहम्मद नूर मोहम्मद हनीफ या दोन मुख्य आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यात मिळून अशाच प्रकारच्या फसवणुकीचे एकूण 16 गुन्हे दाखल झाले असून या रॅकेटमागे मालेगावमधील टोळी सक्रिय असल्याचे निष्पन्न झाले आहे.
Land Scam System Failure : नोंदणी कार्यालयावर मोठे प्रश्नचिन्ह
या संपूर्ण प्रकरणात 20 कोटींच्या जमिनीचा व्यवहार होताना दुय्यम निबंधक कार्यालय किंवा रजिस्ट्रेशन कार्यालयाने करार करणाऱ्या पक्षकारांच्या मूळ कागदपत्रांची आणि बायोमेट्रिक ओळखपत्रांची कडक पडताळणी का केली नाही? असा गंभीर प्रश्न आता उपस्थित होत आहे.
‘लोहा लोहे को काटता आहे’ या म्हणीप्रमाणे जर घोटाळेबाज गुन्हे करण्यासाठी एआयचा (AI) वापर करत असतील, तर सरकारनेही दुय्यम निबंधक कार्यालयांमध्ये अशा फसवणुकी ओळखण्यासाठी ‘एआय-आधारित’ अत्याधुनिक सिस्टीम लागू करण्याची गरज आहे. घोटाळेबाज जर स्मार्ट होत असतील, तर प्रशासनाला आता ‘सुपर स्मार्ट’ व्हावे लागेल.
ही बातमी वाचा:
अभिजीत दिपके झुरळ जनता पार्टी पीसी : आता मी एक नाही, लाखो तरुण माझ्यासोबत आहेत : अभिजीत दिपके
Comments are closed.