दादांच्या मृतदेहाबाबत डॉक्टरांची खळबळजनक माहिती, अजितदादांचं शरीर खूपच जास्त सुजलं होतं, रोहित

दिल्ली: बारामती येथे झालेल्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झाल्यानंतर सुरू असलेल्या चौकशीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. रोहित पवार (Rohit Pawar) यांनी काल (मंगळवारी) मुंबईत पत्रकार परिषद घेतली त्यानंतर आज दिल्लीतही त्यांनी याबाबतची माहिती दिली. अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत अनेक महत्त्वपूर्ण खुलासे केले. अजित पवारांचा अपघात झाला की घात झाला असे वाटते त्याबाबतच्या शंका देखील रोहित पवारांनी (Rohit Pawar) बोलून दाखवल्या, अजित पवारांचा अपघात कसा झाला? ते कारने पुण्याला जाणार होते, मग विमानाने का गेले? यात कुणाचा सहभाग असावा, आधी काय घडलं, अचानक पायलट का बदलला गेला असे अनेक प्रश्न रोहित पवारांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केले. शिवाय अजित दादांना घेऊन जाणाऱ्या व्हीएसआर कंपनीवर देखील त्यांनी अनेक खळबळजनक आरोप केले आहेत. सर्व गोष्टींचा सखोल आणि पारदर्शक तपास करावा अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.(Rohit Pawar)

अजित दादांची बॉडी खूप जास्त सुजलेली होती

त्याचबरोबर आज दिल्लीत रोहित पवार (Rohit Pawar) यांनी नवीन खुलासा केला आहे. अजित पवार यांच्या मृतदेहाबद्दल डॉक्टरांनी काय माहिती दिली होती, याबाबत रोहित पवारांनी खळबळजनक खुलासा केला आहे. त्यांनी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत हा नवीन खुलासा केला आहे. मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही बाब आपण सांगितली नव्हती असंही ते म्हणाले. ज्यावेळी अजित पवारांच्या विमानाचा अपघात झाला, त्यावेळी त्यांचे सोशल मीडियावर काही फोटो आणि व्हिडीओ देखील व्हायरल झाले होते. त्यामध्ये अजित पवारांचा मृतदेह मोठ्या प्रमाणात फुगल्याचा दावा केला जात होता. तो मृतदेह अजित पवारांचा आहे का? याबाबतही संभ्रम होता, त्यानंतर आता  फुगलेल्या मृतदेहाबाबत रोहित पावरांनी माहिती देताना म्हटलं की, “डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार अजितदादांची बॉडी खूप सुजलेली होती. मी जेव्हा त्यांना विचारलं भाजल्यानंतर शरीर सुजतं का?  त्यावर त्यांनी सांगितलं की, हो शरीर सुजते. अजित दादांची बॉडी असामान्यपणे (abnormally swollen) खूप जास्त सुजलेली होती. ती का इतकी सुजलेली होती, ते पाहणंही महत्त्वाचं आहे, अशी नवी माहिती रोहित पवारांनी दिली. यामुळे आता अजित पवारांसोबत नेमकं काय घडलं? याचं गूढ वाढतच चाललं असल्याचं चित्र आहे.(Rohit Pawar)

दादा विमानप्रवासात कधीही धोका पत्करत नसत

रोहित पवार यांच्या मते, सुरुवातीला वेगळे दोन पायलट ही उड्डाण पार पाडणार होते; मात्र ऐनवेळी दोघांनाही बदलण्यात आले. हा निर्णय का घेण्यात आला, याचे स्पष्टीकरण आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. एका फाइलवर स्वाक्षरी करण्यासाठी अजित पवार यांना थोडा उशीर झाला होता, असेही त्यांनी नमूद केले. “दादा विमानप्रवासात कधीही धोका पत्करत नसत. ते नेहमी कॅप्टनच्या सूचनांचे पालन करत,” असे रोहित पवार (Rohit Pawar) म्हणाले. संबंधित कंपनीकडून उड्डाणाला परवानगी देण्यात आल्याचा उल्लेखही त्यांनी केला. तसेच, दुर्घटनेची चौकशी अत्यंत संथ गतीने सुरू असल्याची टीका त्यांनी केली.(Baramati Plane Crash)

कॅप्टन कपूर यांच्या पार्श्वभूमीवर प्रश्न

कॅप्टन कपूर यांच्या पूर्वीच्या नोंदींबाबत शंका उपस्थित करत रोहित पवार यांनी सांगितले की, त्यांच्यावर यापूर्वी शिस्तभंग आणि मद्यप्राशनासंबंधी वाद झाले होते. अशा परिस्थितीत व्हीआयपी उड्डाणासाठी त्यांची नियुक्ती का करण्यात आली, असा प्रश्न त्यांनी विचारला.पायलट बदलण्यामागे ‘वाहतूक कोंडी’चे कारण दिले गेले. मात्र, इतक्या पहाटे मुंबईत ट्रॅफिक जाम असणे शक्य नाही, असे म्हणत त्यांनी या कारणावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

रोहित पवार यांनी काही तांत्रिक मुद्द्यांवरही स्पष्टीकरण मागितले

* अपघातापूर्वीच्या शेवटच्या एका मिनिटात नेमके काय घडले?
* विमानाचा ट्रान्सपोंडर का बंद होता?
* रनवे ११ वर उतरवण्याचा प्रयत्न का झाला? रनवे २९ निवडला असता दुर्घटना टळली असती का?
* डीजीसीएच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार ५००० मीटर दृश्यमानता आवश्यक असताना ३००० मीटरवर लँडिंग का करण्यात आली?
या सर्व प्रश्नांची स्पष्ट आणि अधिकृत उत्तरे मिळणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

निष्पक्ष आणि वेळबद्ध चौकशीची मागणी

“या घटनेबाबत कोणाच्याही मनात शंका राहू नये. त्यामुळे स्वतंत्र, निष्पक्ष आणि वेळबद्ध चौकशी होणे अत्यावश्यक आहे,” असे रोहित पवार यांनी स्पष्ट केले. सत्य बाहेर येणे हीच दिवंगत नेत्याला खरी श्रद्धांजली ठरेल, असेही त्यांनी नमूद केले.

शेवटच्या क्षणी पायलट बदल का?

दुर्घटनेतील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे दोन्ही पायलटांची शेवटच्या क्षणी झालेली अदलाबदल, असे रोहित पवार यांनी म्हटले. मूळ नियुक्त पायलटांना हटवून दुसऱ्या पायलटांची नेमणूक का करण्यात आली, याबाबत स्पष्टता हवी आहे. तसेच, बदललेल्या पायलटांपैकी एक जण हाँगकाँगहून नुकताच परतला होता, ही बाबही संशयास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले.

उड्डाणापूर्वी अनिवार्य असलेली वैद्यकीय तपासणी आणि अल्कोहोल चाचणी योग्य प्रकारे करण्यात आली होती का, याबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. “मुख्य पायलट शेवटच्या क्षणी का बदलला? हा निर्णय नेमका कुणी आणि का घेतला?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

पायलटची पार्श्वभूमी आणि तांत्रिक त्रुटींची शंका

रोहित पवार यांनी संबंधित पायलटच्या पूर्वीच्या नोंदींचाही उल्लेख केला. अल्कोहोल चाचणीत अपयश आणि प्रशिक्षण सत्रे चुकवण्याच्या घटना पूर्वी घडल्याचा दावा त्यांनी केला. त्यामुळे कंपनीतील अंतर्गत संवाद आणि पायलटच्या फिटनेसबाबतची कागदपत्रे तपासावीत, अशी मागणी त्यांनी केली.दुर्घटनेदरम्यान कोणताही ‘डिस्ट्रेस कॉल’ करण्यात आला नाही, तसेच विमानाचा ट्रान्सपोंडर कार्यरत नव्हता, ही बाबही गंभीर असल्याचे त्यांनी सांगितले. विमानाची नियमित देखभाल झाली होती का, त्याच्या उड्डाणक्षमतेला प्रमाणपत्र कोणी दिले, तसेच देखभाल नोंदी सार्वजनिक कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली.

ऑपरेटरचा रेकॉर्ड आणि SOP उल्लंघनाचा मुद्दा

विमानाचे वय, ऑपरेटरचा पूर्वीचा सुरक्षा रेकॉर्ड आणि मानक कार्यपद्धतींचे पालन झाले होते का, याबाबतही त्यांनी शंका व्यक्त केली. पायलटचे ड्युटी तास, इंधन व्यवस्थापन, देखभाल पद्धती आणि सुरक्षा यंत्रणांची कार्यक्षमता यांची सखोल चौकशी व्हावी, असे त्यांनी सांगितले. यापूर्वी संबंधित ऑपरेटरकडून घडलेल्या घटनांचे अहवाल सार्वजनिक का करण्यात आले नाहीत, हाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

आंतरराष्ट्रीय संस्थांकडून चौकशीची मागणी

या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र, वेळबद्ध आणि निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणी करत रोहित पवार यांनी आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक संस्थांचा सहभाग घ्यावा, असे सुचवले. केवळ पारदर्शक तपासच सर्व शंका दूर करू शकतो आणि कोणत्याही गैरप्रकाराची शक्यता नाकारू शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले.

आणखी वाचा

Comments are closed.