थेट अजित पवारांची बनवट सही केली, शिक्का मारून पत्र नियोजन कार्यालयात धाडलं, बीडच्या प्रशासकीय व
बीड वार्ता: राज्यात वारंवार समोर येणाऱ्या या बनावट पत्र आणि ओळखपत्र फसवणुकीच्या घटनांमुळे प्रशासकीय यंत्रणेच्या सुरक्षेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत असताना बीड जिल्ह्यातील प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवणारी घटना समोर आली आहे. थेट राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या सहीचं बनावट पत्र जिल्हा नियोजन कार्यालयात सादर करण्यात आलं आहे. या प्रकारानंतर एका व्यक्तीविरोधात बीडमधील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. माजलगाव तालुक्यातील लहामेवाडी येथील अशोक वाघमारे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. (Beed Crime News)
नेमका प्रकार काय?
मिळालेल्या माहितीनुसार, अशोक वाघमारे या व्यक्तीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावाचा गैरवापर करत त्यांची बनावट सही आणि शिक्का वापरून एक पत्र तयार केलं. हे पत्र थेट जिल्हा नियोजन कार्यालय बीड येथे सादर करण्यात आलं. मात्र अधिकाऱ्यांच्या लक्षात संशयास्पद बाबी आल्यानंतर त्यांनी त्या पत्राची चौकशी केली असता सही बनावट असल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाने तातडीने पोलिसांशी संपर्क साधत वाघमारेविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणाने प्रशासकीय यंत्रणेतील गोपनीयता आणि सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण केले आहेत. उच्चपदस्थ नेत्यांच्या नावाने अशा प्रकारे बनावट पत्र सादर केल्याने प्रशासकीय कामकाजातील विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
यापूर्वीही अशाच स्वरूपाचा प्रकार बीड जिल्ह्यात घडला होता. जुलै 2025 मध्ये भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या नावाने बनावट लेटरहेड आणि सही वापरून तब्बल तीन कोटी वीस लाख रुपयांचा निधी वर्ग करण्यात आल्याचं प्रकरण उघड झालं होतं. आता थेट उपमुख्यमंत्र्यांच्या नावाचा वापर करून फसवणूक करण्याचा प्रकार समोर आल्यानं प्रशासनात खळबळ उडाली आहे.
केंद्रीय मंत्र्याचा पीए असल्याचा बनाव अन्..
दरम्यान, अशाच स्वरूपाचा दुसरा बनावटगिरीचा प्रकार मुंबईतही उघडकीस आला आहे. केंद्रीय मंत्र्यांचा पीए असल्याचा बनाव करून मुंबई पोलीस आयुक्तांच्या जनता दरबारात शिरकाव करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन व्यक्तींना पोलिसांनी अटक केली आहे. धीरेंद्रकुमार व्यास आणि भरत मन अशी या दोघांची नावे आहेत. पोलीस आयुक्तालयात प्रवेश करताना धीरेंद्रकुमार व्यास याने स्वतःला केंद्रीय मंत्र्यांचा पीए असल्याचा दावा केला होता. मात्र पोलिसांना संशय आल्याने चौकशी करण्यात आली असता हा बनाव उघड झाला. या दोघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
आणखी वाचा
Comments are closed.