पुण्यात अजित पवार मोठा डाव टाकणार? सतेज पाटलांना फोन फिरवला, म्हणाले….

अजित पवार आणि सतेज पाटील राज्याच्या तिजोरीची चावी आपल्याच हाती असल्याचा दावा करणाऱ्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांमध्ये माफक यश मिळाले आहे. या निवडणुकीत राज्यभरात भाजपचे 117, शिंदे गटाचे 53 आणि अजित पवार गटाचे 37 नगराध्यक्ष निवडून आले. अजित पवार यांच्याकडे अर्थखाते असल्यामुळे ते ग्रामीण आणि शहरी नगरपालिकांमध्ये विविध योजनांसाठी पैसे उपलब्ध करुन देऊ शकतात, असा संदेश त्यांच्या नेत्यांकडून प्रचारादरम्यान देण्याचा वारंवार प्रयत्न झाले. तरीही अजित पवार यांना महायुतीमध्ये तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. या निवडणुकांपूर्वी भाजपने अजित पवार (Ajit Pawar) गटाचे अनेक स्थानिक नेते आणि पदाधिकारी गळाला लावले होते. आगामी महानगरपालिका निवडणुकीच्यादृष्टीनेही भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांना हातात कमळ देऊन पावन केले आहे. त्यामुळे एकेकाळी अजित पवार यांचा बालेकिल्ला असलेल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि पुणे महानगरपालिकेत (Pune Mahanagarpalika Election 2026) अजित पवार यांच्यासमोर कडवे आव्हान उभे राहिले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात आम्हाला अजित पवार यांच्यासोबत एकत्र लढता येणार नाही, असे अगोदरच स्पष्ट केले आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि पुणे महानगरपालिकेत अजित पवार यांना भाजपशी कडवी टक्कर द्यावी लागणार, हे स्पष्ट आहे. या पार्श्वभूमीवर आता अजित पवार यांच्याकडून पुण्यात भाजपला शह देण्यासाठी जुन्या मित्राला हाताशी धरले जाण्याशी शक्यता आहे. त्यासाठी अजित पवार यांनी काँग्रेसचे नेते सतेज पाटील (Satej Patil) यांना फोन केल्याची माहिती समोर आली आहे.

पुणे महानगरपालिका निवडणुकीत युतीबाबत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये प्राथमिक चर्चा झाली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा काँग्रेस नेते सतेज पाटील यांना फोन आल्याचे सांगितले जाते. यावेळी उभय नेत्यांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या युतीविषयी प्राथमिक बोलणी झाल्याचे समजते. पुण्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची युती झाल्यास राजकीय समीकरणे कमालीची बदलू शकतात. काँग्रेस आणि राष्ट्रवादीची व्होटबँक एकत्रित आल्यास भाजपची अडचण वाढू शकते. या पार्श्वभूमीवर सतेज पाटील आणि अजित पवार यांच्यातील फोनवरील चर्चा अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

2029 सालापर्यंत भाजप शत-प्रतिशत लढण्याइतपत ताकदवान होण्याच्यादृष्टीनेच वाटचाल करत आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात कायम सुरु असते. मध्यंतरी अमित शाह यांनी एका कार्यक्रमात महाराष्ट्रात आता भाजपला कोणाच्याही कुबड्यांची गरज नसल्याचेही म्हटले होते. त्यामुळे आगामी काळात भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना कितपत सोबत ठेवेल, याबाबत साशंकताच आहे. हाच धोका ओळखून अजित पवार यांनी आगामी राजकारणाच्यादृष्टीने आपल्या जुन्या मित्राला साद घातल्याचे बोलले जात आहे. अजित पवार यांनी सतेज पाटील यांना पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी एकत्र येण्याची गळ घातल्याची चर्चा आहे. सोबत आलात तर एकत्र लढू. भाजपचा विजयी वारु रोखण्यासाठी एकत्र आले पाहिजे, असे अजितदादांनी सतेज पाटलांना सांगितल्याचे समजते. अजित पवार यांनी अगोदरच पुण्यात शरद पवार गटाला सोबत घेऊन लढण्याची चाचपणी सुरु केली आहे. अशातच आता काँग्रेस त्यांना येऊन मिळाल्यास जुन्या काँग्रेस-राष्ट्रवादीची एकत्रित ताकद भाजपसाठी मोठे आव्हान ठरु शकते.

आणखी वाचा

मोठी बातमी : ‘पार्थ पवार दोषीच, अजित पवार संत नाहीत’, दमानिया-कुंभार आक्रमक, पुरावे दाखवत मुख्यमंत्र्यांना खडे सवाल

आणखी वाचा

Comments are closed.