धनंजय मुंडेंनी केली ती चूक तु्म्ही करु नका, राष्ट्रवादीच्या बैठकीत अजितदादांचा नेत्यांना सल्ला

मुंबई: बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या करतानाचे फोटो व्हायरल झाल्यानंतर राज्याचे माजी अन्न न नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांना मंत्रि‍पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. संतोष देशमुख हत्याप्रकरणात सीआयडीने (CID) कोर्टात दाखल केलेल्या आरोपपत्रात वाल्मिक कराड (Walmik Karad) हा मुख्य आरोपी आहे. हाच वाल्मिक कराड धनंजय मुंडे यांचा राईट हँड समजला जातो. या प्रकरणाचे धागेदोरे धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यापर्यंत पोहोचल्यामुळे त्याचे परिणती त्यांच्या राजीनाम्यात झाली. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी मंगळवारी रात्री पार पडलेल्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना एक महत्त्वाचा सल्ला दिला. कोणत्याही नेत्याने आपल्या कार्यकर्त्यांवर पूर्णपणे किंवा आंधळेपणाने विश्वास टाकू नये, असे अजित पवारांनी सांगितले. ‘जो दुसऱ्यावरी विसंबला त्याचा कार्यभार बुडाला’, असे अजित पवार यांनी एकप्रकारे सूचित करण्याचा प्रयत्न केला.

या बैठकीत अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना धनंजय मुंडे यांचे उदाहरण देत परावलंबी न होता स्वावलंबी व्हा, असा कानमंत्र दिला. नेत्यासोबत कार्यकर्ते व्यवस्थित नसतील तर त्याची झळ नेत्यासोबत पक्षाला देखील कशाप्रकारे बसते हे धनंजय मुंडे प्रकरणातून आपल्याला दिसून आले आहे, असे अजित पवार यांनी म्हटले.आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत आपल्या आजुबाजूला कोणते कार्यकर्ते आहेत, याची माहिती घ्या. पूर्णपणे कार्यकर्त्यांच्या जीवावर राजकारण नको. परावलंबी न होता स्वावलंबी होण्याचा सल्ला अजित पवार यांनी आपल्या नेत्यांना दिला. धनंजय मुंडे पूर्णपणे कशाप्रकारे वाल्मिक कराड यांच्यावर अवलंबून होते आणि त्याचा फटका कशाप्रकारे पक्षाला बसला हे अजित पवार यांनी आपल्या पक्षाच्या नेत्यांना समजावून सांगितल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.

संतोष देशमुख हत्याप्रकरणानंतर (Santosh Deshmukh Murder Case) वाल्मिक कराड हे नाव प्रचंड चर्चेत आले होते. वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांच्या निवडणुकीचे व्यवस्थापन, प्रचाराची सूत्रे सांभाळायचा. त्यामुळे बीड जिल्ह्यात वाल्मिक कराड याचे मोठे प्रस्थ निर्माण झाले होते. धनंजय मुंडे यांच्या काळात वाल्मिक कराड हा बीड जिल्ह्याचा कारभार चालवायचा, असे सांगितले जाते. त्यामुळे वाल्मिक कराड हा एकप्रकारे बीडचा ‘प्रति पालकमंत्री’ झाल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात होते.  गेल्या काही वर्षांपासून वाल्मिक कराड कारभार सांभाळत असल्याने धनंजय मुंडे हे त्याच्या जीवावर निर्धास्त होते. त्यामुळे बीडच्या राजकारणात वाल्मिक कराडचा शब्द म्हणजे धनंजय मुंडेंचा शब्द, अशी प्रतिमा तयार झाली होती. त्यामुळे साहजिकच संतोष देशमुख प्रकरणात वाल्मिक कराडचा सहभाग आढळून आल्यानंतर या सगळ्याचा संबंध धनंजय मुंडे यांच्याशी जोडला गेला. परिणामी धनंजय मुंडे यांना त्यांच्या आतापर्यंतच्या राजकीय कारकीर्दीतील सर्वात मोठ्या संकटाला सामोरे जावे लागले आणि यामध्ये त्यांचे प्रचंड नुकसानही झाले.

https://www.youtube.com/watch?v=lidvfxevwns

आणखी वाचा

रावाचा रंक कसा झाला? बलाढ्य धनंजय मुंडेंना ‘या’ आरोपांमुळे राजीनामा द्यावा लागला, पाहा A टू Z माहिती

अधिक पाहा..

Comments are closed.