अकोल्यातील गावंडगाव हादरलं! 21 वर्षीय तरुणाचं दारूच्या नशेत टोकाचं पाऊल; गावात संतापाची लाट

चिम न्यूज: अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील गावंडगावात अवैध दारू विक्रीच्या विळख्यात अडकलेल्या एका तरुणाने अखेर जीवनयात्रा संपवली. रुपेश ज्ञानदेव राठोड (वय 21) या तरुणाने गावाच्या शेवटी असलेल्या घराजवळ लिंबाच्या झाडाला साडीच्या दोराने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेने केवळ एक कुटुंबच नव्हे तर संपूर्ण गावात दारू आणि त्यावरील पोलिसांच्या बोटचेप्या भूमिकेमुळे संतापाची लाट उसळली आहे.

गावंडगावातील गावकऱ्यांचा थेट आरोप आहे की, पोलिसांच्या छत्रछायेखाली अवैध दारू विक्री उघडपणे सुरू आहे. किराणा दुकानांतूनही सहज दारू मिळते, आणि तक्रार करणाऱ्यांची नावेच विक्रेत्यांना सांगून त्यांना धमक्या व शिवीगाळ केली जाते. “कोणी मेलं तरी धंदा बंद करणार नाही” अशी पोलिसांची भूमिका असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.

महिला ग्रामस्थांचा आक्रोश

गावातील महिला ग्रामस्थ उज्वला रमेश राठोड यांनी संताप व्यक्त करताना सांगितले की, ‘आम्ही चार-पाच वेळा पोलिसांकडे तक्रारी दिल्या, अर्ज नेले. काही दिवस विक्री थांबली, पण नंतर पुन्हा सुरू झाली. दारू विक्रेते उघडपणे सांगतात की, ‘आम्ही हप्ता देतो, त्यामुळे कोणी काही करणार नाही’. त्याहून भयंकर म्हणजे ठाणेदारच आमची नावे त्यांना सांगतात, आणि मग ते आमच्या घरी येऊन धमक्या देतात. त्यामुळे गावात कोणीही या अवैध धंद्याविरोधात तक्रार करण्यास धजावत नाही.’

तंटामुक्ती अध्यक्षांचे पोलिसांवर थेट आरोप

तंटामुक्ती अध्यक्ष संतोष हिरामण राठोड म्हणाले की, “ग्रामपंचायत सदस्य, सरपंच आणि आम्ही अनेक वेळा पोलिसांकडे अवैध दारू बंद करण्याची मागणी केली, तक्रारी दिल्या, फोन केले, पण कारवाई झाली नाही. आज या निष्क्रियतेमुळे 21 वर्षीय तरुणाने प्राण गमावले. अशीच परिस्थिती राहिली तर गावातील तरुण पिढी संपून जाईल.”

माझ्या भावाचा मृत्यू अवैध दारूमुळेच झाला, कुटुंबाची व्यथा

मृतकाचा भाऊ राहुल राठोड यांनी सांगितले की, “माझ्या भावाचा मृत्यू अवैध दारूमुळेच झाला आहे. दारूच्या नशेत त्याने घरातील साडीचा दोर काढून गळफास घेतला. दारू बंद न झाल्यास गावातील एकही तरुण वाचणार नाही.” असं‌ ते ‘एबीपी माझा’शी बोलतांना म्हणाले.

अंगणवाडी सेविकेची वेदनादायी हाक

अंगणवाडी सेविका इंदुबाई विजय जाधव यांनी सांगितले “आमच्या गावची बरबादी अवैध दारूमुळे होत आहे. तरुण शिक्षणाकडे दुर्लक्ष करून फक्त दारूच्या आहारी गेले आहेत. आज 21 वर्षांचा तरुण दारूच्या नशेत आत्महत्या करतो; त्यापेक्षा दुर्दैव काय असू शकते? त्याच्या वडिलांनीही एक वर्षापूर्वी आत्महत्या केली होती. आता त्याची आई एकटीच उरली आहे. शासन एवढे कसे काय दुर्लक्ष करू शकते? मोठमोठ्या घोषणा फक्त कागदावर; प्रत्यक्ष अंमलबजावणी मात्र शून्य आहे.

तक्रारीनुसार मृतकाने कर्जाला कंटाळून आत्महत्या, पोलिसांची बाजू

चान्नी पोलीस ठाण्याचे ठाणेदार रविंद्र लांडे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “तक्रारीनुसार मृतकाने कर्जाला कंटाळून आत्महत्या केली आहे. या प्रकरणी कायदेशीर कारवाई सुरू आहे आणि पुढील तपास सुरू आहे. गावातील अवैध दारू विक्री संदर्भात अनेक गुन्हे आधीच दाखल केले आहेत आणि वारंवार कारवाई करण्यात येत आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि अवैध धंदे आटोक्यात आणण्यासाठी पोलीस प्रयत्नशील आहेत.”

गावकऱ्यांची ठाम मागणी

गावकऱ्यांचे स्पष्ट मत आहे की, “गावातील दारूचा पुरवठा पूर्णपणे बंद केला पाहिजे. दारू मिळालीच नाही तर कोण पिणार? अन्यथा आत्महत्यांची साखळी सुरूच राहील आणि गावाचे भविष्य संपेल.”

ही घटना केवळ एका तरुणाच्या मृत्यूची नाही, तर एका संपूर्ण पिढीच्या भविष्यावर आलेल्या गडद सावटाची आहे. वारंवार तक्रारी असूनही प्रशासनाचे निष्क्रिय वर्तन, आणि पोलिसांवरचे संरक्षणाचे आरोप यामुळे गावकऱ्यांचा संताप चरमसीमेवर पोहोचला आहे. आता शासन आणि पोलिसांनी या प्रकरणात तातडीने दखल घेऊन कठोर कारवाई करणे अत्यावश्यक आहे, अन्यथा गावाचे भविष्य अंधारात ढकलले जाईल.

इतर महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

Comments are closed.